raging fire : रामगड सिताफळ, जांभूळ प्रक्रिया प्रकल्पाला भीषण आग

रामगड सिताफळ, जांभूळ प्रक्रिया प्रकल्पाला भीषण आग
– आगीत यंत्रसामुग्रीसह लाखोंचे साहित्य जळून खाक

आगीत नष्ट झालेले साहित्य

कुरखेडा : तालुक्यातील रामगड येथील महिला ग्राम संघाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या सिताफळ व जांभूळ प्रक्रीया प्रकल्पाच्या इमारतीला काल मध्यरात्री ते आज पहाटे दरम्यान लागलेल्या भिषण आगीत प्रकल्पातील महत्वाच्या यंत्रसामुग्रीसह लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान ग्रामीण भागात महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा योजने अंतर्गत संगीनी महिला ग्रामसंघ रामगड व शक्ती महिला प्रभाग संघ पूराडा यांच्या संयुक्त विद्यमाने रामगड येथे अभियानाच्या उपजिवीका निधीमधून सिताफळ व जांभूळ फळ प्रक्रीया प्रकल्प ऑक्टोबर 2018 मध्ये सुरु करण्यात आले. दरम्यान डिसेंबर 2022 ला येथे मानव विकास मिशन योजनेतून सोलर सिस्टम बसविण्यात आले होते. दरम्यान या प्रकल्पातून आज सकाळी 6 वाजताच्या सूमारास धूर निघत असल्याची बाब ग्रामस्थाना निदर्शनास आली. आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी प्रकल्पाकडे धाव घेत मदत कार्य सुरु केले. तसेच नगरपंचायत कुरखेडा येथील अग्निशमन यंत्रणेलाही पाचारण करण्यात आले. मात्र आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत प्रकल्पातील सर्व यंत्रसामुग्री, साहित्य व फर्निचर जळून खाक झाले. पुराडा पोलिस ठाण्याचे पथकाने घटनास्थळ गाठित पंचनामा केला. पुढील तपास पुराडा पोलिसांद्वारे केल्या जात आहे. मात्र वृत्त लिहीस्तोवर आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.

30 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

प्रकल्पाला मध्यरात्रीपासून लागलेली भीषण आग सकाळपर्यत धुमसत होती. आग विझेपर्यंत प्रकल्पातील अनेक साहित्य जळून खाक झाली. यामध्ये प्रामुख्याने यंत्रसामुग्री, साहित्य, सिताफळ, जांभूळ व अर्काचा साठा, ग्रामसंघ कार्यालयाचे फर्निचर तसेच दस्तावेज असा एकूण 30 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करीत पुराडा पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आगीमुळे महिलांच्या रोजगारावर संकट

शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहीमेअंतर्गत मागील दोन वर्षापासून ग्रामपंचायत रामगडच्या मालकीचा इमारतीत सूरू असलेल्या या प्रकल्पात परीसरातील जवळपास 50 महिलाना रोजगार उपलब्ध झाले होते. मात्र आगीत हा प्रकल्प पूर्णत: जळून खाक झाल्याने संबंधित महिलांच्या रोजगारावर मोठे संकट निर्माण झाले आहे.

आगीच्या कारणाचा तपास सुरु

रामगड येथील सिताफळ व जांभूळ प्रक्रीया यूनीटला भीषण आग लागल्याची माहिती प्राप्त होताच दुपारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक शिर्के, संवर्ग विकास अधिकारी धिरज पाटील, तसेच पुराडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भूषण पवार यानी घटनास्थळाला भेट देत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रकल्पातील अनेक साहित्य आगीत बेचिराख झाल्याचे निदर्शनास आले. आगीचे नेमके कारण काय? याचा तपास घेतला जात आहे.