darubandi : फाशिटोला ग्रामवासीयांनी घेतला दारूबंदीचा निर्णय

– मुक्तीपथ गाव संघटनेच्या महिलांचा पुढाकार

गडचिरोली : अवैध दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या धानोरा तालुक्यातील फाशीटोला गावाने दारूबंदीचा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. यासाठी विविध गावातील मुक्तीपथ गाव संघटनेच्या महिलांनी विशेष प्रयत्न घेतले.

दुधमाळा ग्रामपंचायतमद्ये समाविष्ट असलेले फाशीटोला या गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत होती. परिणामी परिसरातील दारू पिणाऱ्याची रांगच या गावात असायची. त्यामुळे  दूधमाला , काकडयेली , परसवाडी व महावाडा या सर्व गावातील मुक्तीपथ गाव संघटनेच्या महिलांनी फाशीटोला गावाला दारूविक्रीमुक्त करण्याचा विळा उचलला. त्याअनुषंगाने गाव संघटनेच्या महिलांच्या पुढाकारातून फाशीटोला या गावात सामुहिक क्लस्टर बैठक घेण्यात आली. यात दारू विक्रीचे नुकसान व गावाची होणारी बदनामी याबाबत माहिती देण्यात आली. 

यावेळी चातगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांनी गावकऱ्यांना दारूबंदी चे महत्व व कायद्याची माहिती  समजावून सांगीतली. दारूबंदी व मुक्तीपथच्या कामाविषयीची माहिती  मुक्तिपथ चे संचालक तपोजे मुखर्जी यांनी दिली. त्यानंतर गावातील महिला व पुरुषांनी एकत्र येत दारूबंदीचा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. याप्रसंगी पोलीस पाटील माधुरी उईके, गाव पुजारी मारोती कुमोटी , मुक्तीपथ तालुका संघटक अक्षय पेद्दीवार,  तालुका प्रेरक भास्कर कड्यामी मुक्तीपथ कार्यकर्ता राहुल महाकुलकर, शुभम बारसे, फाशीटोला येथील ग्रामस्थ व विविध गावातील गाव संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.