कमिशन नाही तर पोट कसे भरणार?

– स्वस्त धान्य दुकानदार आर्थिक संकटात

गडचिरोली : केंद्र शासनाने जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीकरिता शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना मात्र मोफत धान्य वितरणाचे मागील वर्षीचेच कमिशन मिळालेले नसतांना यापुढचे कमिशन केव्हा मिळणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बहूतांश दुकानदार रेशनच्या माध्यमातून मिळणा-या कमिशनवरच कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाचे कमिशनच मिळाले नाही तर पोट कसे भरायचे? असा उद्विग्न सवाल स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित करीत आहेत.

पात्र लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून 2 रुपये किलो तांदूळ व 3 रुपये किलो तांदूळ या नाममात्र दराने राशन उपलब्ध करुन दिल्या जाते. कोरोना काळापासून दोन वर्षे मोफत व पैशाचे असे मिळून एका महिन्यात दोनदा राशन उपलब्ध करुन दिल्या गेले. आतामात्र महिन्यातून एकदाच धान्य दिल्या जाणार असून त्याचे पैसे मात्र शिधापत्रिकाधारकांना द्यावे लागणार नाही. पैशाने धान्य दिले जात असतांना स्वस्त धान्य दुकानदार आपले कमिशन कापून धान्यासाठी पैसे भरत होते. या कमिशनची रक्कम लाभार्थ्यांकडून वसूल केली जात होती. मात्र आता नागरिकांकडून राशनचे पैसे घेतले जाणार नसून शासनचे कमिशनचे पैसे देणार आहे. मात्र मागील वर्षभराचे मोफत धान्याचे कमिशन मिळाले नसतांना पुढील वर्षभराचे कमिशन न मिळाल्यास नियमित खर्च तसेच कुटूंबांचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न स्वस्त धान्य दुकानदारांना पडला आहे.

अनेक धान्य दुकानदार भाड्याची खोली करुन राशन दुकान चालवितात. तसेच धान्य वाटपासाठी एक मजूरही ठेवावा लागतो. खोली भाडे, मजूराची मजूर दर महिन्याला द्यावीच लागते. मात्र फेब्रुवारी 2022 पासूनचे कमिशन अद्यापपर्यंत न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांना दिलासा देण्यासाठी शासनाने जुन्या धान्य वितरणाचे तत्काळ कमिशन दुकानदारांना देऊन नियमित कमिशन मिळेल याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी धान्य दुकानदार तथा रायुकॉं विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके यांनी केली आहे.