Elephant Disease Eradication Campaign : दोन तालुक्यात राबिवणार हत्तीरोग दूरीकरण मोहीम

– जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली बैठक

गडचिरोली : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए/आयडीए) 10 ते 20 फेब्रुवारी या कालावधीमध्ये राबविण्याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी व आरमोरी या तालुक्यात सदर मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या मार्गदर्शनात हत्तरोग दुरीकरण औषधोपचार मोहीम जिल्हा समन्वय समिती सभा जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली. 

सभेस मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद,  जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख तसेच सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) नागपूर डॉ. श्याम निमगडे, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार नागपूर विभाग डॉ. भाग्यश्री त्रिवेदी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रात्रीच घ्यावे लागतात रक्त नमुने

हत्तीरोग हा क्युलेक्स डासापासून होणारा संक्रमक आजार आहे. हा आजार हत्तीरोग (फायलेरीया) या नावाने ओळखला जातो. क्युलेक्स डासाची उत्पत्ती घाण पाण्यात, गटारे, सांडपाण्यात होते. दूषित डास मनुष्याला चावतो व त्वचेवर हत्तीरोगाचे जंतू सोडतो. हे जंतू त्वचेतून शरिरात प्रवेश करतात. जंतूचा शरीरातील प्रवेश आणि आजाराची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा 8 ते 16 महिन्यांचा असतो. या कालावधीत रक्ताची तपासणी, औषधोपचार न केल्यास शरीरात जंतूची वाढ होवून हाता-पायावर सुज, अंडवृध्दी होते. रात्री 8 ते 12 वाजताच्या दरम्यान रक्तनमुना घेऊन तपासणी केल्यानंतर हत्तीरोगाचे निदान करता येते.

मोहीमेत लोकसहभाग वाढवा : जिल्हाधिकारी

हत्तीरोग ही गडचिरोली जिल्ह्यातील गंभीर आरोग्य समस्या आहे. यासाठी हत्तीरोग दुरीकरण मोहिमेतंर्गत तीन औषधांची (आयडीए) उंची व वयोगटानूसार एक मात्रा घेऊन या रोगाचा समूळ नाश करता येतो. या तीनही औषधी प्रत्येक घरात आरोग्य कर्मचाऱ्याद्वारे मोफत देण्यात येतील. ही औषधी रिकाम्या पोटी घेऊ नये. तसेच अलबेंन्डाझोल ही गोळी चावून चावून खावी. औषधी देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसमोरच गोळ्या खाणे आवश्यक आहे. 2 वर्षापेक्षा कमी वयाची मुले व गरोदर माता तसेच गंभीर रुग्णांना ही औषधी दिली जाणार नाही. सार्वत्रिक औषधोपचार मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत लोकसहभाग वाढवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आरोग्य विभागाला बैठकीत दिल्या.