शिवराजपुर येथील विक्रेत्यांचा मुद्देमाल नष्ट

गडचिरोली: देसाईगंज तालुक्यातील शिवराजपुर येथील विक्रेत्यांचा मोहफुलाचा सडवा व दारू नष्ट केल्याची कृती गाव संघटनेच्या सदस्यांसह मुक्तीपथ तालुका चमूने केली.

शिवराजपुर येथील काही विक्रेते अवैध दारूविक्री करतात, परिणामी परिसरातील मद्यपी या गावात जाऊन दारू पितात. येथील विक्रेत्यांना वारंवार सूचना करुनही त्यांनी आपला अवैध व्यवसाय बंद केला नाही. अशातच गावातील गोपाळ समाजातील काही विक्रेत्यांनी दारू गाठण्यासाठी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे गाव संघटनेचे सदस्य व मुक्तीपथ तालुका चमूने शोधमोहीम राबविली असता, 18 बोरे मोहफुलाचा सडवा तसेच 21 लिटर दारू आढळली. गाव संघटनेने संपूर्ण मुद्देमाल नष्ट करून दारूविक्रेत्यांना धडा शिकवला.