Attack : जावयाचा प्राणघातक हल्ला ,सासू-सासरे गंभीर जखमी

Attack : जावयाचा प्राणघातक हल्ला ,सासू-सासरे गंभीर जखमी
अहेरी : जावयाने चक्क आपल्या सासू-सासऱ्यावर धारदार शत्राने वार करुन त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना रविवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मुलचेरा तालुक्यातील लगाम येथे घडली. या घटनेने लगाम गावात एकच खळबळ उडाली.

विनयसिंग असे आरोपी जावयाचे नाव आहे. तर लक्कीकांत गाईन (65) व त्यांची पत्नी शोभा लक्कीकांत गाईन असे जखमी सासू-सास-याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मुलचेरा तालुक्यातील गिताली येथील रहिवासी लक्किकांत गाईन हे पत्नी शोभा गाईन व मुलासोबत लगाम येथे हॉटेलचा व्यवसाय करीत लगाम येथेच राहत होते. त्याचा मोठा जावई हा आपली पत्नी मालती हिच्यासोबात गिताली येथे आपल्या स्वगावी राहत होता. तो भंगार जमा करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र काही दिवसांपासुन सासू-सासरे यांच्याशी त्याचे पटत नव्हते. सतत त्यांच्यात वाद होत होते. वाद इतका वाढला की जावई विनयसिंग याने सासरे लक्कीकांत गाईन यांच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. पतीला मारताना पाहून पत्नी शोभा गाईन धाऊन गेल्या. तेव्हा जावयाने सासूच्याही हातावर तसेच गळ्यावर वार केले. घटनेनंतर जावई फरार  झाला. जखमी अवस्थेत पडलेल्या सासू-सास-याने नातेवाईकांना  फोन लावला. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून दोघांनाही लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर डॉ. गेडाम यांनी त्यांना अहेरी उपजिल्हा रुगणालयात हलविण्याचा सल्ला दिला. घटनेची माहिती अहेरी पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी जावयावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे. अधिक तपास अहेरी पोलिस करीत आहेत.