वादग्रस्त पत्रकबाजी प्रकरण , स्विकृत नगरसेवकाची कारागृहात रवानगी

एटापल्ली : स्थानिक नगरपंचायतीचे कॉंग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवक मनोहर बोरकर यांनी प्रशासकीय अधिका-यांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त पत्रकबाजीमुळे त्यांनी सीआरपीसीच्या कलम 122 अन्वये अटक करुन त्यांची न्यायालयीन कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बोरकर यांनी प्रशासकीय अधिकारी अधिका-यांचे नाव न लिहिता त्यांना भ्रष्ट अधिकारी असल्याचा मजकूर असलेली वादग्रस्त पत्रके छापून एटापल्ली शहरात लावली होती. यामुळे शहरात खळबळ उडाली होती.

मनोहर बोरकर यांचे छायाचित्र

बोरकर यांनी एटापल्ली परिक्षेत्रातील विविध विभागात कार्यरत असलेले भ्रष्ट प्रशासकीय अधिका-यांना पुरस्कृत करण्याकरिता ‘शूर, पराक्रमी, भ्रष्टविरोंचा सत्कार व पुरस्कार सोहळा’ नामक पत्र प्रकाशित करुन नोंदणी अर्ज करण्याकरिता आमंत्रित केले होते. वादग्रस्त असलेले सदर 500 पत्रके एटापल्ली येथील एका प्रिटींग प्रेसमधून छापून 25 जानेवारी रोजी एका मजूरकाम करणा-या व्यक्तीला गावभर चिकटविण्यास सांगितले. विशेष म्हणजे छापलेल्या वादग्रस्त पत्रकात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात येणार असल्याचाही उल्लेख केला. सदर पत्रके लावित असतांना स्थानिक पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. संबंधिताने बोरकर यांचे नाव सांगताच पोलिसांनी बोरकरला ताब्यात घेत त्यांचेवर भादंवि कलम 500, 504 नुसार गुन्हा दाखल करुन एटापल्ली उपविभागीय अधिकारी तथा न्यायदंडाधिकारी शुभम गुप्ता यांच्या समक्ष हजर करण्यात आले.

विशेष म्हणजे बोरकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी प्रतिबंधक कारवाई करुन बंध्पत्र लिहून घेण्यात आले होते. त्या बंधपत्राचा भंग केल्याप्रकरणी दंडाधिका-यांनी बोरकर यांना न्यायालयीन कोठउीत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बोरकर यांची वैद्यकीय तपासणी करुन चंद्रपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सदर प्रकरण मागील काही दिवसांपासून चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.