धान विक्रीअभावी शेतक-यांना मनस्ताप

धान विक्रीअभावी शेतक-यांना मनस्ताप
– पेरमिली धान खरेदी केंद्रावरील प्रकार
गडचिरोली : जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाद्वारे धान खरेदी प्रक्रिया सुरु आहे. मात्र अनेक ठिकाणी धान खरेदी प्रक्रियेला घेऊन शेतक-यांच्या तक्रारी येत आहेत. असाच प्रकार अहेरी तालुक्यातील पेरमिली टीडीसी धान खरेदी केंद्रावर निदर्शनास येत आहे. सदर केंद्रावर धान खरेदी प्रक्रियेला घेऊन शेतक-यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. धान खरेदीला होणा-या विलंबामुळे मागील आठवडाभरापासून पेरमिली परिसरातील शेतकरी केंद्रावर ठिय्या मांडून बसले आहेत.  

धान विक्रीच्या प्रतिक्षेत असलेले शेतकरी

पेरमिली धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीच्या प्रक्रियेमुळे या क्षेत्रातील शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. अशातच सदर केंद्रावर हमालीच्या नावावर शेतक-यांची आर्थिक लूट केल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्राप्त माहितीनुसार हमालीच्या नावावर शेतक-यांकडून प्रति क्विंटल विशिष्ट रक्कम वसूल केली जात आहे. परिणामी आठवडाभरापासून केंद्रावर धान विक्रीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतक-यांना आर्थिक पिळवणूकीलाही सामोरे जावे लागत आहे.

एकीकडे सदर धान खरेदी केंद्रावर मागील काही दिवसांपासून धान खरेदी प्रक्रिया थंडबस्त्यात पडले असल्याने शेतकरी धान विक्रीसाठी केंद्रावर आठवडाभरापासून ठिय्या मांडून धान विक्रीची प्रतिक्षा करीत आहेत. तर दुसरीकडे काही व्यापारी हीच संधी साधून खरेदी केंद्रावर पोहचून शेतक-यांच्या अज्ञानतेचा फायदा घेत शेतक-यांच्या सातबारावर शेकडो क्विंटल धान खरेदी केंद्रावर विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

सरपंचासह पोलिस केंद्रावर

पेरमिली येथील धान खरेदी केंद्रावर मनमानी पद्धतीने सुरु असलेल्या धान खरेदी प्रक्रियेमुळे त्रस्त असलेल्या शेतक-यांनी स्थानिक सरपंचासह पेरमिली पोलिसांना समस्या मांडित लक्ष वेधले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पेरमिली उपपोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी धवल देशमुख तसेच सरपंच किरण नैताम यांनी प्रत्यक्ष धान खरेदी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतक-यांची समस्या जाणून घेतली. केंद्र संचालकाने ऑनलाईन समस्या असल्याचे कारण सांगताच प्रभारी अधिकारी देशमुख यांनी तब्बल 150 ते 200 शेतक-यांचे ऑनलाईन नोंदणी पोलिस ठाण्यात पूर्ण केली. तर शेतक-यांना मनस्ताप न देता व्यापा-यांना केंद्रात प्रवेश न देण्याच्या सूचना सरपंचांनी केंद्र संचालकांना दिली.