Accident : दुचाकीस्वार युवकाचा गेला जीव

Accident : दुचाकीस्वार युवकाचा गेला जीव 
गडचिरोली : भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गडचिरोली तालुक्यातील चांभार्डा टोली येथे रविवारला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. गणेश नीलकंठ सिडाम (26) रा. चांभार्डा असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

गणेश हा काही कामानिमित्त चांभार्डा येथून 4 किमी अंतरावरील मरेगाव येथे गोपाळा चर्लेवार यांच्या दुचाकीवर अन्य एका इसमासोबत गेला होता. काम आटोपून गावाकडे येत असताना सायंकाळी 6 वाजता चांभार्डा टोली येथील ग्रापं सदस्य दुधराम चनेकार यांच्या घरासमोरील रस्त्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातात गणेश सिडाम, डंबाजी चापले व गोपाळा चर्लेवार हे तिघेही खाली कोसळले. यात चापले व चर्लेवार यांना किरकोळ मार लागला तर गणेश हा गंभीर जखमी झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने रुग्णवाहिकेद्वारे गणेशला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. परंतु तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी गणेशला मृत घोषित केले.