गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई ; नक्षल्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहीत्य हस्तगत

Gadchiroli Today
गडचिरोली :  धानोरा उपविभाग अंतर्गत कटेझरी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीमध्ये कटेझरी-चारवाही जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलिस दलाला टीसीओसी कालावधीत मोठे यश आले आहे.

नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहीत्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ‘ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहीत्याचा वापर नक्षलवाद्यांकडुन नक्षल सप्ताह तसेच इतर प्रसंगी केला जातो. दरम्यान, कटेझरी-चारवाही जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले असल्याच्या खात्रीशीर माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दल  व बीडीडीएस पथकाच्या  जवानांनी  मंगळवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास नक्षलविरोधी अभियान सुरू केले असता,  जंगलात एका संशयित ठिकाणी लपवून ठेवलेले स्फोटके व इतर साहीत्यांचा साठा मिळुन आला. इतर नक्षल साहीत्य हस्तगत करून दोन नग ग्रेनेड हे बीडीडीएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने जागेवर नष्ट करून नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून काढला. 
ही कारवाई  पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक  यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या नेतृत्वात पोमके कटेझरीच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली.

हस्तगत साठ्यामध्ये ‘या’ स्फोटकांचा समावेश

मिळुन आलेल्या साठ्यामध्ये २ नग जिवंत ग्रेनेड, २ नग ग्रेनेड फायर कफ, १८ नग वायर बंडल, ५ ब्लास्टींग स्टिल डब्बे, १ प्लॅस्टीक डब्बा (टुल किटसह), ४ नग वायर कटर, ७ नग ग्रेनेड माऊंटींग प्लेट, १ नग लहान लोखंडी आरी, २० नग नक्षल पुस्तके, ७ टु-पीन सॉकेट, १ स्टील डब्बा झाकणी व २ नग प्लॅस्टीक झिल्ली या स्फोटकांचा समावेश आहे.

नक्षल्यांनी आत्मसमर्पण करावे : नीलोत्पल
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभियानात सहभागी जवानांचे कौतुक केले. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, नक्षल्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.