अहेरी शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या : भाजपा नगरसेवकांचे निवेदन

-समस्या तत्काळ मार्गी लावण्याची मागणी  
गडचिरोली TODAY 
अहेरी : शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु, मागील काही महिन्यांपासून या योजनेत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे भाजपा नगरसेवकांनी जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देऊन शहरातील पाण्याची समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी केली आहे. 

  निवेदन देताना भाजपा पदाधिकारी
शहरवासियांकडून प्राप्त तक्रारीची त्वरित दखल घेत अहेरी नगर पंचायतचे पाणीपुरवठा सभापती दीपाली नामेवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नगरसेवक, पदाधिकारी आणि शहरातील नागरिकांनी जीवन प्राधिकरण अहेरी कार्यालयाला धडक देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जनतेच्या सर्व समस्या लक्षात आणून दिल्या. तसेच समस्या तातडीने सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भाजपा पदाधिका-यांनी दिला. यावर सकारात्मक प्रतिसाद देत सर्व समस्या येत्या 8 दिवसात निकाली काढू, असे आश्वासन अधिका-यांनी दिले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, पाणीपुरवठा सभापती दीपाली नामेवार, नगरसेवक शालिनी पोहणेकर, लक्ष्मी मद्दीवार, सुनीता मंथनवार, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, विकास उईके, संतोष मद्दीवार, मुकेश नामेवार, श्रीकांत नामेवार, पवन दोंतुलवार, साईनाथ डेरकर, अशोक बोंमनवार, नवले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

‘या’ समस्यांमुळे शहरवासीय त्रस्त 
वारंवार पाणीपुरवठा बंद होणे, फिल्टर मशीन असतानाही गढूळ पाण्याचा पुरवठा करणे, बिल्चिंग पावडर व तुरटीचे योग्य प्रमाणात मिश्रण न करणे, शहरात अनेक ठिकाणी लिकेज व्हॉल्व व पाईपलाईनची दुरुस्ती न करणे, दररोज ठरलेल्या वेळी पाणी न सोडणे अशा अनेक समस्या निर्माण होत आहे. यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत.