अतिदुर्गम भागातील 50 शेतकऱ्यांची कृषी सहल

गडचिरोली TODAY
– पोलिस व आदिवासी विकास विभागाचा पुढाकार
गडचिरोली : जिल्ह्यातील शेतक-यांना आधुनिक शेतीचे तंत्र समजून घेता यावे व यातून शेतक-यांची आर्थिक उन्नती साधता यावी, या उद्देशाने पोलिस दादालोरा खिडकी आणि एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या कृषी सहलीअंतर्गत धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील 50 शेतक-यांना राज्याच्या विविध जिल्ह्यांच्या अभ्यास दौ-यावर पाठविण्यात आले आहे. 

कृषी सहलीला हिरवी झेंडी दाखवितांना पोलिस अधिकारी

जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाबाहेर पडून पारंपारिक शेतीला बगल देत विविध अत्याधुनिक शेती करणा-या शेतक-यांच्या बांधावर जाऊन तेथील परिस्थितीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करुन ज्ञानाचा वापर करुन पारंपारिक शेतीपद्धतीत बदल करुन आर्थिक उन्नती साधतील या उद्देशाने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून धानोरा हद्दीतील उपपोस्टे पेंढरी, चातगाव, गोडलवाही, गट्टा (फु.) पोस्टे कारवाफा अंतर्गत येणा-या 50 शेतक-यांची अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे यांच्या उपस्थितीत शेतक-यांची विशेष कृषी सहल बसने रवाना करण्यात आली. 

यापूर्वी या अभ्यास दौ-यांसाठी आतापर्यंत कोटमी पोलिस मदत केंद्र हद्दीतील 32 महिला शेतकरी, भामरागड उपविभाग हद्दीतील 20 शेतकरी तसेच धानोरा हेडरी आणि एटापल्ली उपविभागातील 42 शेतकरी, याशिवाय अहेरी, जिमलगट्टा व सिरोंचा हद्दीतील 46 शेतक-यांची कृषी सहल आयोजित केली होती. आता या पाचव्या सहलीमध्ये धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील 50 शेतक-यांची निवड करण्यात आली. 15 ते 26 फेब्रुवारीपर्यंत अशी 12 दिवस सदर कृषी दर्शन सहल व अभ्यास दौरा राहणार आहे. या पाचव्या कृषीदर्शन सहलीला हिरवी झेंडी दाखविताना अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस आीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतीश देशमुख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुधाकर गौरकर आदी उपस्थित होते.

विविध शेती प्रक्षेत्रांना भेटी देणार 
सदर कृषी अभ्यास दौ-यादरम्यान संबंधित शेतकरी नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, राहूरी (जि. अहमदनगर), पुणे, बारामती (जि. पुणे), फलटन, महाबळेश्वर (जि. सातारा), वारणानगर (जि. कोल्हापूर), कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बारशी (जि. सोलापूर), परभणी, यवतमाळ, वरोरा (जि. चंद्रपूर) येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्रांना भेटी देणार आहेत. त्याचप्रमाणे विविध कृषी विद्यापीठांनाही भेटी देऊन आधुनिक व प्रगत कृषी तंत्रज्ञान जाणून घेणार आहेत. या तंत्रज्ञानाचा अनुभव जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेती व्यवसायात करुन आर्थिक प्रगती साधणार आहेत.