‘या’ कारणामुळे हिवाळ्यातही दुचाकीस्वाराचा रेनकोट घालून प्रवास

रेनकोट घालून प्रवास करतांना दुचाकीस्वार

गडचिरोली TODAY
गडचिरोली: आता हिवाळा ऋतू संपत असून उन्हाच्या चटका लागत आहेत. मात्र, एटापल्ली आणि अहेरी तालुक्यातील चाकरमानी पावसाळ्याच्या दिवसाप्रमाणे चक्क रेनकोट घालून रस्त्यावर दुचाकी चालाविताना निदर्शनास येत आहे. सुरजागड लोह प्रकल्पातून खनिजाची वाहतूक करणा-या ट्रकमुळे रस्त्यावर उडणा-या धुळीपासून बचाव करण्यासाठी दुचाकी चालकांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरुन चार वर्षपूर्वी संबंधित कंपनीद्वारे कच्चे लोहखनिज काढायला सुरुवात झाली. सदर लोहखनिजाच्या वाहतूकीसाठी दररोज हजारो अवजड टक एटापल्ली येथून मार्गक्रमण करीत असतात. या अवजड वाहनांच्या आवागमनामुळे एटापल्ली-अहेरी-आष्टी मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे इतर वाहन धारकांना या मार्गावरुन वाहतूक करतांना मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित कंपनीद्वारे मुख्य गावातील रस्त्यांवर मार्गक्रमणादरम्यान धुळ उडू नये यासाठी पाण्याचा शिडकाव केला जात आहे. मात्र उर्वरीत मार्गावर मात्र कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे सर्वसामान्य वाहतूकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अवजड वाहनांमुळे एटापल्ली-आलापल्ली-आष्टी मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णत: उखळले असून ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे.
यातच 24 तास चालणा-या अवजड वाहनांमुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या धुळीमुळे कपड्यांचा रंगच धुळयुक्त होऊन जात असल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहे. या मार्गावरुन अनेक शासकीय चाकरमानी प्रवास करीत असतात. या धुळीपासून बचाव करण्यासाठी या चाकरमान्यांनी चक्क रेनकोट घालून दुचाकीने प्रवास सुरु केला आहे. यात अनेक शालेय शिक्षकांचा समावेश असून पांढरे स्वच्छ कपडे धुळीने माखू नये म्हणून त्यांनी ही शक्कल लढविली आहे. त्यामुळे एरव्ही पावसाळ्यात दृष्टीस पडणारे रेनकोट चाकरमाने दुचाकीचालक चक्क हिवाळ्यात प्रवासात वापरित असल्याचे निदर्शनास येत आहेत.