कुरखेडा रुग्णालयात नेत्ररोग तज्ञांचा अभाव, रुग्णांची हेळसांड : शहर विचार मंचतर्फे निवेदन

गडचिरोली TODAY
कुरखेडा : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील रुग्णांची मोठी वर्दळ असते. मात्र, याठिकाणी नेत्ररोग तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा उपलब्ध नसल्याने नेत्र रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामूळे नियमीत नेत्ररोग तज्ञांची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शहर विचार मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमीत ठमके यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करतांना पदाधिकारी
कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे आंतररुग्ण विभागासह बाह्यरुग्ण विभाग आहे. याठिकाणी आरोग्याचा अत्याधुनिक सोई सूविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कूरखेडा, कोरची, देसाईगंज या तीन तालूक्यासह लगतच्या गोंदिया जिल्हयातील रुग्णही मोठ्या संख्येत आरोग्य सेवेचा लाभ घेतात. मात्र, मागील अनेक वर्षापासून नियमित नेत्ररोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने स्थानिक स्तरावर उपचार मिळत नाही. त्यामूळे नेत्र रुग्णांची हेळसांड होत आहे.
डोळ्यांचा आजार हा विशेषता वृद्धांनाच अधिक असल्याने उपचाराकरीता दूरचा प्रवास करीत शहरात पोहचने त्यांना शक्य होत नाही. नाईलाजाने जावे लागल्यास अधिकचा आर्थीक, मानसिक व शारिरिक त्रास वृद्धांना सहन करावा लागतो. ही समस्या लक्षात घेता रुग्णालयात नेत्ररोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. याबाबद आवश्यक कार्यवाही व पाठपूरावा करण्याचे आश्वासन अधिक्षक डॉ. अमीत ठमके यांनी दिले.निवेदन देताना शहर विचार मंचाचे संयोजक अध्यक्ष माधवदास निरंकारी, प्रवक्ता ऍड. उमेश वालदे, डॉ. सतिश गोगूलवार, मोहन मनूजा, रामभाऊ वैद्य, डॉ.जगदीश बोरकर, प्रा विनोद नागपूरकर, सिराज पठान, सागर निरंकारी व विचार मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते .