Naxalite couple arrested फरार नक्षली दाम्पत्यास हैद्राबाद येथून अटक

16 वर्षांपासून होते फरार 
गडचिरोली जिल्हा पोलिस दलाचे मोठे यश 
गडचिरोली TODAY 
गडचिरोली : नक्षल चळवळ सोडल्यानंतर कुणालाही थांगपत्ता लागू नये म्हणून सन 2006-07 पासून तेलंगणा व आंध्रप्रदेशात विविध ठिकाणी स्वत:ची ओळख लपवून वास्त्यव्यास असलेल्या नक्षली दाम्पत्यास 20 फेब्रुवारी रोजी हैद्राबाद येथून अटक करण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. टुगे उर्फ मधूकर चिनन्ना कोडावे (42) रा. बस्वापूर ता. अहेरी. शामला उर्फ जामनी मंगलू पूनम (35) बंगाडगुडम जि. बिजापूर (छत्तीसगड) अशी अटक करण्यात आलेल्या नक्षली दाम्पत्यांची नावे आहेत.  
टूगे कोडापे हा नक्षली कमांडर असून त्याची पत्नी शामला उर्फ दसरू पुंगाटी नक्षल सदस्य म्हणून कार्यरत होती. दरम्यान दोघेही नक्षल चळवळ सोडून 2006 मध्ये फरार झाले होते. दलम सोडल्यानंतर कुणालाही थांगपत्ता लागू नये म्हणून तेलंगणा व आंध्रप्रदेशात विविध ठिकाणी पोलिस दलास गुंगारा देत आपली स्वत:ची ओळख लपवून ते राहात होते. टूगे हा तेथील सुरक्षा कंपनीत वॉचमन या पदावर तर पत्नी शामला पुंगाटी ही एका कारच्या शोरूममध्ये हॉऊसकिपींमध्ये काम करीत होती. हे दोघेही सध्या हैद्राबाद येथे वास्तव्यास असल्याची गुप्त गडचिरोली पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे त्यांचेवर मागील एक वर्षापासून पाळत ठेवण्यात आली होती. दरम्यान 20 फेब्रुवारी रोजी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिस दलाचे सपोनि सचिन झनक व सपोनि शिवहरी सरादो यांच्या नेतृत्चात जवानांनी गोपनियरित्या अभियान राबवून दोघांनाही हैद्राबाद येथून अटक करण्यात आली. 

10 लाखांचे होते बक्षीस
पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार टुगे कोडपे हा अहेरी दलममध्ये सदस्य या पदावर भरती झाला असून सन 2002 पासून सिरोंचा दलममध्ये कार्यरत होता. सन 2006 पर्यंत अहेरी, जिमलगट्टा व सिरोंचा दलममध्ये कमांडर पदावर कार्यरत राहून दलम सोडून फरार झाला होता. त्याच्यावर 9 खून, 8 चकमक, 2 दरोडा, 4 जाळपोळ, 1 खुनाचा प्रयत्न व 1 इतर असे एकूण 25 गुन्हे दाखल आहेत. शासनाने याच्यावर 8 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. शामला पुनम ही अहेरी दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तीचेवर आजपावेता 1 खून, 5 चकमक, 1 जाळपोळ, 1 दरोडा व 1 इतर असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर 2 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.