शासनाच्या निर्णयाचा फटका : शिक्षणासाठी चिमुकल्या ‘प्रिन्स’ची दररोज सहा किमीची पायपीट

आईसोबत शाळेत जाताना प्रिन्स

गडचिरोली TODAY 
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त लष्कर गावातील प्रिन्स आरकी हा चिमुकला सध्या शिक्षणासाठीच्या संघर्षासाठी चर्चेत आला आहे. राज्य शासनाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या झळा राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या चिमुकल्या ‘प्रिन्स’ला सुद्धा सोसाव्या लागत आहेत. गावातील शाळा बंद झाल्याने चिमुकल्याला शिक्षणासाठी सहा किमीची पायपीट करावी लागत आहे. 
पटसंख्या कमी असल्याने भामरागड तालुक्यातील बऱ्याच शाळांचे इतरत्र समायोजन करण्यात आले आहे. लष्कर येथील रहिवासी प्रिन्स आरकी याच्याही गावातील शाळा बंद पडली. त्यामुळे अनेकांची शाळा सुटली, तर काहींनी इतरत्र प्रवेश घेतला. प्रिन्सचे आईवडील दोघेही शिक्षित असल्याने मुलाच्या शिक्षणाबद्दल ते जागरूक आहेत. त्यामुळे लष्करपासून 3 किलोमिटर असलेल्या होड्री येथे प्रिन्सने प्रवेश घेतला. मात्र भामरागड तालुक्यात आजही शेकडो गावांना जोडणारे रस्ते नाहीत. त्यातच नक्षल्यांची दहशत. अशा विपरित परिस्थितीत पाहिलीत शिकणा-या चिमुकल्या प्रिन्सला दररोज ६ किलोमिटर जंगलातून पायी जावे लागत आहे. 
 एकीकडे प्रिन्सचा शिक्षणासाठी प्रिन्सचा संघर्ष सुरु आहे तर दुसरीकडे त्याला ‘फिट’च्या आजाराचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्याला शाळेत सोडण्यासाठी कधी वडील तर कधी आई त्याच्या सोबतीला असते. शासनाच्या निर्णयामुळे इतक्या लहान वयात प्रिन्सच्या वाट्याला आलेला संघर्ष मोठाच आहे. सर्वाधिक दुर्लक्षित असल्याने या भागात असे अनेक ‘प्रिन्स’ संघर्ष करताना दिसून येतात. शासनाच्या या निर्णनुसार भामरागड तालुक्यातील लष्कर, मोरडपार व आलदंडी येथील शाळा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी गेले आहेत. तर काही विद्यार्थ्यांना पायदळ प्रवास करीत शिक्षण घ्यावे लागत आहे.