दारूच्या व्यसनातून सुटका झालेल्या रुग्णमित्रांनी भारावून व्यक्त केला ‘तो’ वाईट अनुभव

गडचिरोली TODAY 
-डॉ. आरती बंग यांच्या उपस्थितीत दारूमुक्त रुग्णांचा सन्मान सोहळा 
 गडचिरोली :  मुक्तिपथ अंतर्गत सुरु असलेल्या तालुका क्लिनिक मधून उपचार घेतलेल्या व सद्यस्थितीत दारूच्या व्यसनातून मुक्त असलेल्या रुग्णमित्रांचा सन्मान सोहळा देसाईगंज तालुका क्लिनिकमध्ये नुकताच पार पडला. यावेळी ‘सर्च’च्या मानसिक आरोग्य विभाग प्रमुख डॉ. आरती बंग   यांच्या उपस्थितीत ४७ रुग्णमित्रांचा दुपट्टा, पुष्पगुच्छ व गीत पुस्तिका भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक रुग्णमित्रांनी दारूच्या व्यसनामुळे आलेला वाईट अनुभव भारावून व्यक्त केला.   
याप्रसंगी दीप प्रज्वलन करून मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर रुग्णमित्रांचा सत्कार सोहळा पार पडला. सन्मानाला उत्तर देतांना अनेक रुग्णमित्रांनी भारावून आपले अनुभव कथन केले. एका रुग्णाने सांगितले की,  दारूची सुरवात मित्रांचा आग्रह, ते पितात तर आपण पण पिऊन पाहायला पाहिजे, अशी दारूची सुरवात झाली. कुटुंबाला त्रास होत होता, शरिराचे  नुकसान होत चालले होते. हे सर्व कळूनही वळत नव्हते. रोज बायकोला मारत होतो. लपून भांडे चोरून दारू पित होतो. बायकोला नोकरी सोडायला लावली. अशा वेळी वडसा तालुका व्यसन उपचार क्लिनिकमध्ये उपचार सुरु केला. आता तब्बेत खूप सुधारायला लागली. आता दारू सोडून चार वर्षे पूर्ण झाले. सायकल रिपेरिंगचे दुकान सुरु केले आहे. तेव्हापासून कळले की, दारू सुटू शकते थोडा प्रयत्न केला पाहिजे. 
दुसऱ्या रुग्णाने सांगितले की, आधी घरातील लोक विश्वास ठेवत नव्हते. पोर जवळ यायला घाबरत होते. बायकोला १५ वर्षे झाले साडी घेतली नव्हती. पण जेव्हापासून दारुबंद केली पैसे वाचवून बायकोला साडी घेतली. एकाने सांगितले की, चार वर्षे दारू बंद केली तर गाडी घेतली व घर पण बांधल्याचे सांगितले. एका रुग्णाच्या पत्नीने सांगितले की,  यांचा सारखा चांगला नवरा नाही पण दारू जेव्हा पित होते तेव्हा राक्षस बनत होते. पोर थरथर कापत होते. पण आता सहा महिने दारूबंद केली तर पोर सुद्धा जवळ जात आहेत. दुसऱ्या महिलेने सांगितले की, माझे पती आधी दुकानाकडे लक्ष देत नव्हते, गिराइक पण तुटले होते. पण आता आम्ही दुकान दुसऱ्या गावी बनविला असल्याचे सांगितले. असे विविध अनुभव रुग्ण व कुटुंबीयांनी या कार्यक्रमात व्यक्त केले. 
या कार्यक्रमाला प्रभाकर केळझरकर, देसाईगंज तालुका संघटक भारती उपाध्ये, कुरखेडा तालुका संघटक मयूर राऊत, आरमोरी तालुका संघटक विनोद कोहपरे, समुपदेशक प्राजू गायकवाड यांच्यासह ४७ रुग्णमित्र व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन वडसा तालुका चमूचे अनुप नांदगिरवार, भारती उपाध्ये व चमूनी केले तर संचालन प्राजू गायकवाड यांनी केले.

दारू सोडणे कठीण नाही : डॉ. आरती बंग

डॉ. आरती बंग यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले कि, दारू पिणे हा आजार आहे, या आजारातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबाची मदत हि त्या दारू पिणे बंद करणाऱ्या व्यक्तीला खूप महत्वाची असते. स्वत: रुग्णाचे प्रयत्न, क्लिनिक मधील उपचार, औषध घेणे व कुटुंबाचा आधार इत्यादी काळजी घेतली तर दारू सोडणे कठीण नाही. तुम्ही जसे चांगले झाले तसेच इतर दारूच्या रुग्णांना क्लिनिक मध्ये उपचाराला आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.