उद्यापासून बारावीची 49 केंद्रावर परीक्षा : अधिकाऱ्यांचे पथक कोणत्याही केंद्रावर, कोणत्याही क्षणी धडकणार

संग्रहित छायाचित्र

गडचिरोली TODAY 

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने मंगळवार, 21 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा (12 th Exam) घेण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात 49 केंद्रावरुन एकूण 12 हजार 346 विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहेत. विशेष म्हणजे, यावर्षीची बारावी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांची नजर राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आयएएस आणि आयपीएस दर्जाचे अधिकारी व त्यांचे पथक कोणत्याही केंद्रावर, कोणत्याही क्षणी धडक देऊ शकतात. 
शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी कोरोना काळात प्रत्येक शाळास्तरावर केंद्र देऊन परीक्षा घेण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यामुळे परीक्षा पूर्वीसारख्या मुख्य परीक्षा केंद्रावरच होणार आहेत. परीक्षांबाबत राज्य सरकारने महत्वाची अधिसूचना जारी केली आहे. यंदा बारावी आणि दहावी परीक्षांचे नियम कडक करण्यात आले आहेत. उमदेवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास, मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर घेतला, विकत घेतला किंवा पाठविला तर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे निलंबन केले जाणार आहे. या परीक्षेत कोणताही गैरप्रकार होवू नये यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. 

तालुकानिहाय परीक्षा केंद्र
गडचिरोली तालुक्यात बारावीचे 7 परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. आरमोरी 6, अहेरी 4, भामरागड 1, चामोर्शी 9, धानोरा 2, देसाईगंज 5, एटापल्ली 2, कोरची 2, कुरखेडा 5, मुलचेरा 3 व सिरोंचा तालुक्यात 3 परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहेत. मागील वर्षी इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी 49 मुख्य केंद्र आणि 146 उपकेंद्र ठेवण्यात आले होते. मात्र यंदा उपकेंद्रांची व्यवस्था नाही. केवळ मुख्य केंद्रावरच बारावीची परीक्षा होणार आहे.

एवढ्या केंद्रांवर होणार व्हिडीओ चित्रीकरण 
संभाव्य कॉपीचे प्रमाण असणारे केंद्र व संभाव्य कॉपीचे प्रमाण अधिक असणारे परीक्षा केंद्र, परीक्षा केंद्रावर यापूर्वी झालेल्या परीक्षेत 5 किंवा त्यापेक्षा जास्त कॉपी केसेस झाल्या आहेत ते केंद्र संभाव्य कॉपीचे प्रमाण असणारे केंद्र तर ज्या ज्या केंद्रावर बाहेरुन उपद्रव होतो, अशी संभाव्य कॉपीचे प्रमाण अधिक असणारे परीक्षा केंद्रे ठरविण्यात आली आहेत. त्या ठिकाणी व्हिडीओ चित्रीकरण केले जाईल. संभाव्य कॉपीचे प्रमाण असणारे परीक्षा केंद्र इयत्ता बारावीचे 6 व कॉपीचे प्रमाण अधिकारी असणारे परीक्षा केंद्र 10 आहेत.