सर्वधर्मियांनी साजरी केली शिवजयंती ; समाजासाठी आदर्श ठरतो ‘विहिरगाव’

गडचिरोली TODAY
गडचिरोली : संपूर्ण देशात शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारला धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातही शिवाजी महाराजांना शहरासह गावागावात मोठ्या उत्साहात अभिवादन करण्यात आले. मात्र देसाईगंज तालुक्यातील विहिरगाव येथे सर्वधर्मियांनी साजरी केलेली शिवजयंती समाजासाठी आदर्श ठरली आहे. या दिवशी या गावात दिवाळी, दसरा या सणासारखा उत्सव साजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती विहिरगावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, शिवाजी महाराजांची जयंती गावातील सर्वधर्मियांनी मिळून साजरी केली. यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेतला. युवकांनी मिळून स्वराज्य नवयुवक प्रतिष्ठाण विहिरगावची स्थापना केली. मागील वर्षापासून शिवाजी महाराजांची जयंती युवकांच्या पुढाकारातून गावात साजरी होत आहे. याकरीता काही दिवसांपासूनच कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वच धर्मातील युवकांचा सहभाग होता. जयंतीदिनी सकाळी साडेपाच वाजतापासून ग्रामअभियान राबविण्यात आले होते. गावातील प्रत्येक घरासमोर सडासारवण करून रांगोळीने अंगण सजविण्यात आले होते. सकाळी 9 वाजता शिवाजी महाराजांची पालखी गावातील वॉर्डावॉर्डातून काढण्यात आली. यावेळी बुद्ध विहार, शिवमंदिर याठिकाणी पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यादरम्यान, गावातील अनेक महिलांनी आपल्या घरासमोर पालखीचे पूजन केले. या पालखीसोबत गावातील सर्वधर्मिय ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, युवक-युवती, बालगोपाल सहभागी झाले होते. पालखीचा समारोप संत तुकडोजी महाराज मंदिर प्रांगणात करण्यात आला. यानंतर जन्मोत्सव समारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. रात्री शिवमंदिर येथे गावक-यांसाठी सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. एकंदरीत विहिरगावात शिवजन्मोत्सव समाजापुढे आदर्श ठरेल, अशा पद्धतीने साजरा करण्यात आला. 

अन्य जयंती उत्सव सामूहिकरित्या करतात साजरे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसोबतच विहिरगावात विविध महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे होतात. या कार्यक्रमात देखील सर्वधर्मियांची उपस्थिती असते. त्यामुळे या गावात सामाजिक सलोखा दिसून येतो. लग्न कार्यक्रमातही गावातील सर्व नागरिक एकमेकांच्या मदतीला धावून जातात. धार्मिक कार्यक्रम असोत की सामाजिक गावातील सर्वधर्मिय नागरिक हिरिरीने सहभाग घेतात. त्यामुळे गावात तंटे, भांडण फार कमी प्रमाणात दिसून येतात. गावातील स्वच्छतेवरही गावक-यांनी भर दिला असून अनेक वॉर्डात स्वच्छता मोहीम राबविली जाते. 

सर्व झेंडे झाले एकरूप
प्रत्येक धर्मिय व समाजाचे आपआपले झेंडे आहेत. या झेंड्याचा वापर राजकारणी आपल्या पद्धतीने करतात. मात्र विहिरगावात सर्व धर्माचे झेंडे एकरुप झाल्याचे शिवजन्मोत्सवानिमित्त दिसून आले. शिवजन्मोत्सव कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिराजवळ घेण्यात आला. याच ठिकाणी बौद्ध धर्मियांची नियोजित जागा आहे. बाजुला आदिवासी समाजाची राखीव जागा आहे. त्यामुळे या समाजाचे आपआपले झेंडे याठिकाणी उभे आहेत. शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी याठिकाणी भगवा, निळा, पिवळा असे झेंडे एकरुप झाल्याचे दिसून येत होते. या कार्यक्रमात गावातील सर्वच धर्मातील नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम सर्व समाजासाठी आदर्श ठरला आहे.