महागाईच्या काळात संगणक परिचालकांची तुटपुंज्या मानधनात बोळवण

निवेदन सादर करतांना संघटनेचे पदाधिकारी

–  पुन्हा एकदा आंदोलनातून वेधणार लक्ष 
गडचिरोली TODAY 
आरमोरी : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना दरमहा सात हजार रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर ग्रामपंचायतींमध्ये काम करावे लागत आहे. तसेच हे मानधनही वेळेवर मिळत नसल्याने संगणक परिचालक मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पातून किमान वेतनासाठी निधीची तरतूद करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानात १ मार्चपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातीलही संगणक परिचालक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. 
संगणक परिचालक हे ग्रामपंचायतमध्ये बसून सर्व प्रकारचे कामे करत असल्याने त्यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक आहे. ग्रामविकास विभागाने स्थापन केलेल्या यावलकर समितीने २०१८ मध्ये या सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतिबंधात पदनिर्मिती करण्याची शिफारस केलेली आहे. त्यानुसार राज्य संघटनेच्या माध्यमातून संगणक परिचालकांना ग्रामपंचायतस्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी शासनाकडे अनेक आंदोलनाच्या माध्यमातून केली. ११ मार्च २०२१ मध्ये तत्कालीन ग्रामविकासमंत्री यांनी मागणी मान्य करून लेखी आश्वासन देत प्रश्न सोडविण्याचे मान्य केले होते. परंतु त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या माध्यमातून २७ व २८ डिसेंबर २०२२ रोजी रात्रंदिवस आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत यावलकर समितीने केलेल्या शिफारशीनुसार संगणक परिचालकांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. यासंदर्भातील फाईल ग्रामविकास विभागामार्फत वित्त विभागास पाठवण्यात येणार होती. परंतु अद्याप पर्यंत शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने संगणक परिचालक संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाचा पावित्रा हाती घेतला आहे. 

२७ फेब्रुवारी पासून बेमुदत कामबंद 
न्याय मागण्यांसाठी संगणक परिचालक संघटनेच्या वतीने २७ फेब्रुवारी पासून मागणी मान्य होईपर्यंत ग्रामपंचायत अंतर्गत संगणक परिचालकाकडे असलेली सर्व कामे बंद ठेऊन बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १ मार्च पासून मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निवेदन संगणक परिचालक संघटना आरमोरी तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सादर करण्यात आले आहे.