गोंडवाना विद्यापीठ: विक्रमी वेळेत 300 परीक्षांचे निकाल जाहीर

गडचिरोली TODAY 
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या हिवाळी 2022 सत्रात घेण्यात आलेल्या एकूण 300 परीक्षांचे निकाल गोंडवाना विद्यापीठाने विक्रमी वेळेत जाहीर केले असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
अदिवासी भागातील राज्यातील एकमेव गोंडवाना विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक पातळीवर अतिशय आश्वासक काम करत आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या सहयोगाने अध्ययन, अध्यापन, तसेच परीक्षा विषयक नावीन्यपूर्ण उपक्रम विद्यापीठातर्फे राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी मोबाईल ॲप, उन्हाळी 2022 सत्राच्या गुणपत्रिकेमध्ये क्यूआर कोडचा समावेश व त्याद्वारे कॅम्पस मुलाखतीत गुणपत्रिका पडताळणीची सुविधा आदी उपक्रमांना विद्यार्थी तसेच महाविद्यालयांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 
महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम 2016 च्या कलम 87, 88 व 89 नुसार परीक्षेच्या तारखेपासून जास्तीत जास्त 45 दिवसांत निकाल जाहीर करणे गरजेचे असते. मात्र गोंडवाना विद्यापीठाने विक्रमी वेळेत म्हणजे केवळ 29 दिवसातच सर्व निकाल जाहीर केले आहे. निकाल जाहीर करण्याची ही सरासरी केवळ 16 दिवस इतकी आहे.  परीक्षा सुरळित पार पडल्यानंतर निकाल लावण्याकरिता कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली  मुख्य मुल्यांकन अधिकारी प्रा. डॉ. उत्तमचंद कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने निकाल वेळेत घोषित झाले.