‘हा’ रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा : Accident ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

गडचिरोली TODAY 
गडचिरोली : गिट्टीची वाहतूक करणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान आलापल्ली – एटापल्ली मार्गावरील मद्दीगुडम गावानजीक घडली. निखील नीलकंठ सेपाई रा. कागजनगर (तेलंगणा) असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे. विशेष म्हणजे, सदर मार्गावर दोन महिन्याच्या कालावधीत हा तिसरा अपघात झाला आहे. 
 प्राप्त माहितीनुसार, एम. एच. 13 सीयु 0420 या क्रमांकाचे ट्रक गिट्टी भरुन आलापल्लीवरुन एटापल्लीच्या दिशेने जात होते. दरम्यान ट्रकचालक सदर ट्रक अत्यंत हयगयीने व निष्काळजीपणाने चालवित असतांना मद्दीगुडम गावाजवळ समोरुन येणाऱ्या निखीलच्या टी. एस. 20 बी 0564 क्रमांकाच्या दुचाकीस समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात निखील ट्रकच्या खाली चिरडल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठित आरोपी ट्रकचालक राकेश दिवाकर समर्थ याचेवर कलम 304 अ भादंवी व मोटार वाहन नियम कायदा सह कलम 134, 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक किशोर मानभाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

 टायगर ग्रुपने केली मदत 
आष्टी ते एटापल्ली मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने वाहतूकदारांना मार्गक्रमण करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान मागील दोन महिन्याच्या कालावधीत सदर मार्गावर तिसरा अपघात घडला आहे. यात तेलंगणा राज्यातील निखील सेपाईचा बळी गेला आहे. घटना घडताच टायगर ग्रुप आलापल्लीच्या स्वयंसेवकांनी तातडीने घटनास्थळ गाठित रुग्णवाहिकेने मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनास पाठविण्यास मदत केली.