जहाल नक्षल्यास 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

  अटक करण्यात आलेल्या नक्षलीसह पोलिस जवान

जहाल नक्षल्यास 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी  
– दामरंचा जंगल परिसरातून केली अटक 
गडचिरोली TODAY 
गडचिरोली : टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना दामरंचा जंगल परिसरातून एका जहाल नक्षलवाद्यास अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास मोठे यश आले आहे. वेल्ला केसे वेलादी (35) रा. येडापल्ली ता. भोपालपट्टनम जि. बिजापूर (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलीचे नाव असून त्याला 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. 
 नक्षलवाद्यांद्वारे फेब्रुवारी ते मे या कालावधीत टीसीओसी कालावधी साजरा केला जातो. यादरम्यान नक्षली चळवळीद्वारे हिंसात्मक कारवायाचा घडवून आणल्या जात असल्याने त्या दृष्टीने जिल्हा पोलिस दलाद्वारे नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. याअंतर्गत गुरुवार, 23 फेब्रुवारी रोजी विशेष अभियान पथकाच्या जवानांद्वारे दामरंचा जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना वेल्ला केसे वेलादी या अटक केली. वैल्ला वेलादी हा 2001 पासून जनमिलीशीया म्हणून नक्षलचे काम करीत होता. त्यानंतर 2006 पासून तो दिलीप आणि मंगी (संड्रा) दलममध्ये सदस्य पदावर होता. दरम्यान नक्षलीस न्यायालयापूर्वी हजर केले असता न्यायालयाने 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
वैल्ला वेलादी याचा जाळपोळ, चकमक, दरोडा, जीवे ठार मारणे आदी गुन्ह्यात सहभाग होता. माहे सप्टेंबर 2021 मध्ये मडवेली जंगल परिसरात झालेल्या पोलिस-नक्षल चमकमीत त्याचा सहभाग होता. तसेच 23 डिसेंबर 2022 रोजी टेकामेटा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत त्याने छत्तीसगड दलमचा डीव्हीसीएम भास्कर यास पळून जाण्यास मदत केली होती, अशी माहिती चौकशीवरुन प्राप्त झाली आहे.  पुढील तपास गडचिरोली पोलिस दल करीत आहे.  
सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायावर अंकुश लावण्यासाठी नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून नक्षल्यांनी हिसंक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.