युवा पिढीने मायबोली मराठीचे संवर्धन करावे : डॉ. श्याम खंडारे

गोंडवाना विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिन साजरा
गडचिरोली TODAY  
गडचिरोली : जागतिकीकरण व स्पर्धेच्या युगात युवा वर्ग आपल्या मायबोली मराठी साहित्यापासून काहीसा दुरावलेला दिसून येत आहे. साहित्य वाचन मागे पडले आहे. त्यामुळे लिखाणही मागे पडले आहे. वाचन, विचार, चिंतन साहित्यातून येते. आपल्या मायबोलीचे संवर्धन करण्यासाठी युवा पिढीने वाचन, लेखन करावे, असे आवाहन मराठी विभागाचे समन्वयक डॉ. श्याम खंडारे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या ग्रंथ प्रदर्शनीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे संचालक डॉ. अनिता लोखंडे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विवेक जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
याप्रसंगी वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. क्रीडा विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे म्हणाल्या, मायबोलीचे संवर्धन करण्यासाठी वाचन, लेखण अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक मुल्यांची जपणूक करायची असेल तर वाचन, लेखण केले पाहिजे. प्रास्ताविकात डॉ. विवेक जोशी यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद करून मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे सांगून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मागील सात दिवसांपासून विद्यार्थ्यांसाठी कविता आणि कथाकथन यांच्या वाचनाचा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. सविता साधमवार, प्राध्यापक शुभम बुटले , बाघमारे, प्रा. शेंडे यांनी परिश्रम घेतले.