हत्ती कॅम्पमधील नवजात पिल्लू मृत्यू प्रकरण : शवविच्छेदन अहवालानंतर कारण स्पष्ट होणार

गडचिरोली TODAY 
गडचिरोली : सिरोंचा वनविभागाअंतर्गत कमलापूर येथील शासकीय हत्ती कॅम्पमधील मंगला नावाच्या हत्तीनीचा नवजात पिल्लू जंगल परिसरात मृतावस्थेत आढळून आल्याची खळबळजनक घटना 27 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. मृत पिल्लाच्या शवाचे शवविच्छेदन करण्यात आले असून प्रयोगशाळेतील अहवालानंतर मृत्यचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती सिरोंचा वनविभागाचे उपवनसरंक्षक पूनम पाटे यांनी दिली. 

प्रसूती झालेली हीच ती मंगला हत्तीण
 सिरोंचा वनविभाग अंतर्गत कमलापुर वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्पमध्ये 8 हत्ती आहेत. यात 2 नर व 6 मादांचा समावेश आहे. त्यामध्ये मंगला नामक 32 वर्षीय हत्तीण हिची गर्भधारणा झाली होती. जानेवारी ते फेब्रुवारी 2023 दरम्यान प्रसुती होईल असा अंदाज होता. त्यानुसार 27 फेब्रुवारी रोजी जंगलात प्रसुती झाली. परंतु नवजात पिल्लु मृतावस्थेत आढळले. मृत पिल्लाच्या शवाचे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी व मुलचेराचे पशुधन विकास अधिकारी यांनी शवविच्छेदन करून प्रयोगशाळेत चाचणी करीता पाठविण्यासाठी नमूने गोळा करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतील अहवालानंतर नवजात पिल्लाचा मृत्यु कशामुळे झाला याची माहिती मिळू शकेल. प्रसुती नंतर मंगला नामक हत्तीणची प्रकृती चांगली आहे. अशी माहिती उपवनसरंक्षक पूनम पाटे यांनी दिली आहे.