डीबी पथकाची कारवाई ; दोन दारू तस्करांकडून 1.20 लाखाचा मुद्देमाल जप्त

आरोपीसह डीबी पथकाचे जवान

गडचिरोली TODAY
गडचिरोली :  वेगवेगळ्या कारवाईत डीबी पथकाने दोन दुचाकीसह 1 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करीत दोन दारु तस्करांवर दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुरुदेवसिंह रामसिंह दुधानी (59) रा. गोकुळनगर, नागेश दसा कुडमेथ (29) रा. सकिनगट्टा ता. अहेरी अशी आरोपींची नावे आहेत. 
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी गुरुदेवसिंह दुधानी हा एम. एच. 33-1946 या क्रमांकाच्या दुचाकीने चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली शहरात विदेशी दारुची तस्करी करीत असतांना डीबी पथकाने नवेगाव येथे सापळा रचित त्याला रंगेहाथ पकडले. यात 7 हजार 500 रुपयाच्या देशी दारुसह 37 हजार रुपये किंमतीचे दुचाकी असा एकूण 44 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई गुरुवारी नवेगाव मार्गावरील शंखदरबार रुग्णालयासमोर करण्यात आली. यात नागेश कुडमेथ हा एम. 33 आर 9211 क्रमांकाच्या दुचाकीने दारुची तस्करी करीत असतांना डीबी पथकाने त्याला रंगेहाथ अटक केली. या कारवाईत 21 हजाराच्या विदेशी दारुसह 55 हजाराची दुचाकी असा एकूण 76 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असा एकूण 1 लाख 20 हजार 500 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई  उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे धनंजय चौधरी, स्वप्नील कुडावले, परशुराम हलामी, अतुल भैसारे, सुजाता ठोंबरे यांनी केली.