पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : अभाविप

संग्रहित छायाचित्र

GADCHIROLI TODAY
गडचिरोली :  बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. 
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात स्टेट बोर्ड, सीबीएससी अंतर्गत इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अतिशय महत्वाची आहे. बारावीच्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक भविष्य अवलंबून असते. अशातच महाराष्ट्र राज्यात पेपर फुटीचे प्रकार वाढत आहेत. इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेत बोर्डाकडूनच त्रुटी आढळून आल्या. तर त्याच दिवशी परभणीमध्ये इंग्रजी विषयाचा पेपर फुटला. 3 मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील एका केंद्रावर पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास आधीच गणित विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे वायरल झाली. या घटनांकडे महाराष्ट्र परिक्षा बोर्ड, महाराष्ट्र शासन हलगर्जीपणा करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पेपर फुटीचा प्रकार वाढत चालला आहे. एचएससी बोर्डाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत सर्व परीक्षा केंद्रावर नियंत्रणाची व्यवस्था करावी, या पेपर फुटी प्रकरणाची चौकशी करून सदर प्रकरणात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेत बारावी बोर्डाच्या वतीने लवकरात लवकर चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रदेश मंत्री शक्ती केराम यांनी केली आहे.