वाघाने पाडला बैलाचा फडशा

  वाघाने ठार केलेला बैल

महावाडा शेतशिवारातील घटना
GADCHIROLI TODAY 
गडचिरोली : शेतात चराई करीत असलेल्या बैलावर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना रांगी-मोहली मार्गावरील वनपरिक्षेत्र सहाय्यक कार्यालय मोहली अंतर्गत महावाडा नं. 2 येथील शेतशिवारात बुधवारी रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.  
प्राप्त माहितीनुसार, महावाडा न. 2 येथील सिंधुबाई कलिराम नरोटे यांनी काल रात्री गोठ्यात बैल बांधले होते. मात्र रात्री अचानक बैलाला बांधलेली दोरी तुटल्या गेली. यामुळे सदर बैल गावालगतच असलेल्या शेतशिवारात गेले. येथे बैल चराई करीत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून बैलाला ठार केले. घटनेची माहिती क्षेत्रसहाय्यक कार्यालय मोहली यांना प्राप्त झाली. माहिती मिळतात क्षेत्र सहाय्यक घनश्याम नवघरे व वन मजूर सीताराम हुरा यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यात पशुमालकाचे अंदाजे 32 हजाराचे नुकसान झाले आहे. सदर घटनास्थळ मोहली-रांगी मार्गावरील महावाडा नंबर 2 येथून अवघ्या 200 मीटर अंतरावर आहे. याठिकाणी वाघाचे वास्तव्य आढळल्याने या मार्गाने जाणारे प्रवासी, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.