जागतिक महिला दिन विशेष : आधारविश्व फाउंडेशन व महान रणरागिणी…!

GADCHIROLI TODAY     
आज आठ मार्च जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने जगातील सर्व माता, भगिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा सर्व प्रथम विद्येची देवता, माता क्रांतिज्योती सावित्रीआई फुले, मासाहेब जिजाऊ, भारतमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अनाथांची माय सिंधूताई सपकाळ ,महाराणी  ताराबाई तसेच होऊन गेलेल्या सर्व महा नारीशक्तींना कोटी, कोटी विनम्र अभिवादन करते. आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी बरेचजण  नारीशक्तींवरती लिखाण करत असतात आपल्या वाचणात  आले असेल. यात काही शंका नाही. त्याचप्रमाणे आजही अशा काही नारीशक्ती आपल्या भारत भूमीमध्ये सुद्धा जन्माला आलेल्या आहेत आणि नि:स्वार्थ भावनेने कार्य करत आहेत त्यांच्या बद्दल मला अभिमान वाटतो. अशाच काही नारी शक्ती आमच्या गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा आहेत  त्यांचे कार्य पाहून निसर्ग सुद्धा त्यांना वंदन करतो. अशीच एक गडचिरोली जिल्ह्यात सर्वांना माहीत असणारी महिलांची एकमेव संस्था आहे त्या संस्थेचे नाव आधारविश्व फाऊंडेशन आहे व त्या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती गीता हिंगे आहेत. या संस्थेबद्दल दोन शब्द लिहिण्याचे मला भाग्य लाभले हेच माझ्यासाठी खूप काही आहे कारण, त्या संस्थेचे कार्यच एवढे महान आहेत की, दहा पुरुष एकत्र आले तरी त्या प्रकारचे कार्य करु शकत नाही ते आधारविश्व फाउंडेशन संस्थेतील सर्व रणरागिणींनी एकत्र येऊन करून दाखवले आहेत, याचा मला फार अभिमान वाटतो.

 आधारविश्व फाउंडेशन संस्थेत 155 रणरागिणी आहेत. या विषयी थोडक्यात जाणून घेऊया संस्थेच्या अध्यक्षा गीता हिंगे यांच्या मनात लहानपणापासूनच शिक्षणाबरोबर समाजकार्य करण्याची  खूप आवड होती. आदिवासी जिल्ह्यात रंजल्या, गांजलेल्या लोकांचे आपण आधार बनावे असे सदैव त्यांना वाटत होते पण, हे सर्व करायचे कसे त्यांना प्रश्न पडला होता, तरीही त्यांनी हार न मानता संघर्षाच्या वाटेवरून चालत असताना  काही रणरागिणींनी त्यांना प्रोत्साहन दिले. नंतर त्यांनी 2017 ला आधारविश्व फाऊंडेशन संस्थेची स्थापना केली. ही एक संस्था नाही तर.. एक कुटूंबच आहे.  या कुंटुबातील सर्व रणरागिणी मिळून एकमेकींना साथ देऊन कितीही कठीण कार्य करायचे असतील तर मागे वळून बघत नाही त्यामुळेच व त्यांच्यात असलेल्या माणुसकी धर्मामुळे ह्या कुटुंबाची दूरवर ओळख झालेली आहे. आज पर्यत त्यांनी बरेच असे महान सामाजिक उपक्रम व कार्य नि:स्वार्थ भावनेने केलेले आहेत त्यांना कोणाचीही मदत मिळत नाही. स्वतः त्या आपल्या परीने जमेल असे साहित्य असोत किंवा पैसे एकत्र गोळा करुन समाजात असलेल्या रंजल्या, गांजल्यांच्या मदतीसाठी धावून जातात आणि आपुलकीने‌  मदत करतात हे त्यांचे माणुसकी धर्माचे कार्य नित्यनेमाने सहा,सात  वर्षापासून सुरु आहेत.
   सर्व  रणरागिणींनी केलेले कार्य मी थोडक्यात का होईना लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचा पहिला उपक्रम होळीच्या दिवशी सेमाना देवस्थान परीसरात जाऊन कचरा साफ करून इतर कचऱ्याची होळी केली, त्यानंतर तिथे बहुसंख्य महिला  उपस्थित होत्या त्यांना चहा, नास्ता देण्यात आला. याचा उद्देश हाच होता की जिवंत झाडाच्या फांदया तोडून पर्यावरणाचे नुकसान करण्यापेक्षा होळीच्या दिवशी आपला आजूबाजूचा परिसर साफ करून कचऱ्याची होळी करणे.अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील खेडेगावात जाऊन पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले, सर्वात मोठे कार्य म्हणजेच कोरोना काळात हातावर आणून खाणाऱ्या लोकांना उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी सतत एकवीस दिवस त्यांना मदत केली, त्याच प्रमाणे लाकडाऊनची घोषणा झालेली असताना सुद्धा  भेंडाळा परीसरात पारधी लोक जडीबुटी व गाद्या बणवणारे काही लोक राहत होते ते उपाशी राहु नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आव्हानाला अनुसरून माणुसकीच्या नात्याने संस्थेच्या वतीने पंधरा दिवस पुरेल एवढे जीवनावश्यक पोहचवले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गृहविलगीकरणात असलेल्या सर्व रुग्णांना 2 महिने पर्यंत घरपोच मोफत टिफिन ची सेवा दिली कारण लॉकडाऊन मुळे सर्व उपहारगृह, मेस,हॉटेल्स बंद होते. एवढेच नाही कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या ज्यांना कुणी वाली नाही किंवा कोरोनाच्या भीतीपोटी नातेवाईक अंतिम संस्कार करायला तयार नव्हते  त्यावेळी स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता अध्यक्षा गीता हिंगे यांनी आपल्या दोन सदस्या सोबत स्वतः स्मशानभूमीत जाऊन मुखाग्नि दिली. हे पाहिजे तेवढे सोपे नाही. संत गाडगेबाबा महाराज तसेच राष्टसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एसटी बसस्थानक तसेच नदी घाटावर  जाऊन स्वच्छता केली, विधवा भगिणींना समाजात सन्मानाने जगता यावे म्हणून दरवर्षी मकरसंक्रांतीला समाजाची पर्वा न करता हळदीकुंकू लावून साडीचोळी देऊन गरीब विधवा महिलांचा सत्कार करतात.असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी समाजाला दिशा दाखवली आहे. 

      आधारविश्व फाउंडेशन जसे नाव आहे तसेच रंजल्या गांजलेल्याचा आधार आहेत या संस्थेबद्दल तसेच सर्व रणरागिणींच्या बाबतीत कितीही लिहिलं तरी कमीच आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे ती म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यातील आधारविश्व फाउंडेशन महिलांची एकमेव संस्था असून व त्यांचे एवढे महान कार्य असून सुद्धा महाराष्ट्र शासना पर्यत का पोहचू शकत नाही. ..? का म्हणून दखल घेतली जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. आज मला त्यांचे महान कार्य व माणुसकी धर्म बघून अभिमान वाटतो. आणि शासनाला विनंती करते की, ह्या सर्व रणरागिणींच्या कार्याची  शासनाने दखल घ्यावी संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशभर त्यांच्या महान कार्याची ओळख व्हावी ही अत्यंत काळाची गरज आहे. कारण त्या स्वतः पुरते न जगता इतरांच्या विषयी जास्त विचार करत असतात. 
सौ.संगीता संतोष ठलाल 
मु.कुरखेडा जि.गडचिरोली 
७८२१८१६४८५