परीक्षा केंद्र संचालकाचा Video Viral प्रकरण ; कुरखेडा पोलिसांत तक्रार दाखल

संग्रहित छायाचित्र

– नवीन केंद्र संचालकाची नियुक्ती
GADCHIROLI TODAY
गडचिरोली :  कुरखेडातील 627 या क्रमांकाच्या परीक्षा केंद्रावर कार्यरत परीक्षा केंद्र संचालक किशोर कोल्हे यांनी 12 वीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना स्वतःच्या रूमवर बोलावून पैसे घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी शिक्षण विभागाने तातडीने ऍक्शन घेत कॉपीमुक्त अभियानाला गालबोट लावणाऱ्यास केंद्र संचालक पदावरून हटविले आहे. सोबतच याप्रकरणी कुरखेडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कॉपी करू देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून केंद्र संचालक पैसे घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी तथा तालुका परीक्षक सी. ए. पुराणिक यांना चौकशीचे आदेश दिले. सदर चौकशीचा अहवाल व नागपूर विभागीय मंडळाचे सचिव यांच्या सूचनेनुसार किशोर अंबरदास कोल्हे यांना तत्काळ केंद्रसंचालक पदावरून पदमुक्त करण्यात आले. सोबतच कालीदास पुंडलीक सोरते (उच्च माध्यमिक शिक्षक) यांची नियुक्ती केंद्र संचालक म्हणून करण्यात आली आहे. 
 सदर गैरप्रकाराची तक्रार प्रशासनाच्या वतीने कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली आहे. तसेच सदरच्या गंभीर प्रकाराबाबत चौकशी करणेबाबत विभागीय सचिव यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना आदेश दिले आहेत. इयत्ता 10 वी 12 वी च्या परीक्षा संबंधाने कोणताही गैरप्रकार झाल्यास दोषी विरुध्द नियमानुसार कडक कार्यवाही केली जाईल, असे निवेदन शिक्षणाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे सदस्य सचिव आर. पी. निकम यांनी दिले आहे.