दुचाकीची पायदळ जाणाऱ्या महिलांना धडक : चार गंभीर तर पाच किरकोळ जखमी

जखमींना रुग्णवाहिकेने भरती करताना 

GADCHIROLI TODAY
गडचिरोली:  दुचाकीची पायदळ जाणाऱ्या महिलांना धडक बसून झालेल्या अपघातात दोन महिला व दोन दुचाकीस्वार गंभीर तर इतर पाच जण जखमी झाल्याची घटना कोरची-मोहगाव मार्गावर शनिवारला रात्री 7.30 वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारला कोरची तालुक्यातील मोहगाव येथे आदिवासी कंवर समाज संघटनेद्वारो सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात एकूण 21 जोडपे विवाहबद्ध झाले. विवाह सोहळ्यात कोरची तालुक्यातील नागरिकांसह छत्तीसगड राज्यातील नागरिक सहभागी झाले होते. विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी खुनारा गावातील 5-6 महिला सायंकाळच्या सुमारास पायदळ जात होत्या. तर छत्तीसगड येथील रहिवासी कुमेश कुंजाम, सुशील कुंजाम, विनोद उईके व बिदेशी चंद्रवंशी हे चार जण दुचाकीवर विवाह सोहळा आटोपून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. दरम्यान कोरची-मोहगाव मार्गावर भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटून पायदळ जाणा-या महिलांना जोरदार धडक बसली. या घटनेत दोन महिलांसह दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. तर दुचाकीवरील इतर दोघांसह तीन महिला असे पाच जण किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती कोरची पोलिसांना देण्यात आली.
किरकोळ जखमींना कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र गंभीर जखमी दोन महिला व दोन दुचाकीस्वार युवकांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

जखमींमध्ये यांचा समावेश
सुलोचना बखर (50), कुमारीन जुडा (45), कुमेश कुंजाम (18), सुशील कुंजाम (20) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर नर्मदा करशी (38), सुरजाबाई करशी (35), सुमन करशी (35), विनोद उईके (33) व बिदेशी चंद्रवंशी (20) अशी जखमींची नावे आहेत.