मासेमाराचा जाळीत अडकून दुर्दैवी मृत्यू

GADCHIROLI TODAY 
भामरागड :  नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी जाळे टाकले. परंतु जाळ्यातील मासे काढताना पाण्याच्या प्रवाहात वाहत जाळीत अडकून मासेमाराचा मृत्यू झाल्याची घटना 10 मार्च रोजी कोठी येथे उघडकीस आली. चैतू रैनू नरोटी (55) रा. कोठी असे मृत मासेमाराचे नाव आहे. 
चैतू नरोटी हे बुधवारला सकाळच्या सुमारास पर्लकोटा नदीत मासेमारीसाठी गेले होते. जाळी पसरवून ते घरी परत आले. दुस-या दिवशी म्हणजेच गुरुवारला सकाळी जाळे काढण्यासाठी ते नदीपात्रात गेले. परंतु घरी परतलेच नाही. चैतू घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने चैतूच्या भावंडांना सोबत घेवून नदीपात्र परिसरात शोध घेतला. मात्र चैतूचा थांगपत्ता लागला नाही. मासेमारी करण्यासाठी सोबत नेलेले साहित्य व डोंगासुद्धा परिसरात दिसला. याचवेळी सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवून सुद्धा त्याचा पत्ता लागला नाही. तेव्हा चैतूची पत्नी व भावंडे घरी परतले. त्यानंतर शुक्रवारला सकाळपासून पुन्हा शोध घेतला असता, मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळीत चैतूचा मृतदेह अडकलेला दिसून आला. घटनेची माहिती कोठी पोलिस मदत केंद्राला देण्यात आली. त्यानंतर मृतदेह नदीपात्रातून पाण्याबाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी भामरागड येथे पाठविला. अधिक तपास प्रभारी अधिकारी संजय झराड करीत आहेत.