भारनियमनाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश : आरमोरी-गडचिरोली मार्गावर चक्काजाम

GADCHIROLI TODAY 

आरमोरी : कृषीपंपाला 24 तास वीज पुरवठा करावा तसेच वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आरमोरी- गडचिरोली मार्गावरील जुना ठाणेगाव बसथांब्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 
 आरमोरी तालुक्यातील वासाळ, चामोर्शी माल, डोंगरगाव, शिवणी, करपडा, लोहारा आणि इतर क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान व मका पिकाची लागवड केली आहे. सध्या काही शेतकऱ्यांचे रोवणे सूरू असून काही जणांचे रोवणे आटोपले आहे. मात्र कृषीपंपाला केवळ आठ तास वीज देण्यात येत असल्याने तीही रात्रीच्या सुमारास दिली जात असल्याने रात्री शेतावर जावून पिकांना पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे पाण्याअभावी धान पीक करपत आहेत. तसेच या परिसरात वाघाची दहशत असल्यामुळेही शेतकऱ्यांना शेतावर जाणे कठीण झाले आहे. धान, मका पिकासह ईतर पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला 24 तास वीज पुरवठा करावा, चामोर्शी, वनखी, ठाणेगाव, वासाळा परिसरातील वाघाचा बंदोबस्त करुन रानडुकरांनी धान, मका, भाजीपाला पिकाची केलेली नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
आंदोलनात जिल्हा किसान सेल जिल्हाध्यक्ष वामण सावसागडे, सरपंच छाया खरकाटे, वामन निबोळ, अनिल किरमे, राजु सामृतवार, शेषराव कुमरे, कालिदास सेलोटे, किरण घोडाम, गजेंद्र लाकडे, राजेंद्र नैताम, पुंडलिक जराते, चंद्रशेखर शेंडे, निखिल धार्मिक, लोभानंद नंदरधने, हरीचंद्र राऊत, स्वप्निल ताडाम, गुलाब सयाम, प्रेमिला गजभिये, मंदा गोडाणे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.