शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी ; जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्ट

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्याला येलो अलर्टसह 16 व 17 मार्चला असे दोन दिवस ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 15 मार्चला येलो अलर्टचा इशारा दिला आहे. या दिवशी एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह अतिशय तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र त्यानंतर पुढचे दोन दिवस 16 व 17 मार्च रोजी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह, वादळी वारा व गारपीठीचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान वा-याचा वेग ताशी 30-40 किमी प्रति तास राहणार आहे. तसेच 18 मार्चला येलो अलर्ट असून एक-दोन ठिकाणी मेघगर्जना व वादळी वा-याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांनी घराबाहेर निघताना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.
सध्या शेतक-यांच्या रबी पिकांची मळणी सुरु आहे. तर काही शेतक-यांची मळणी झालेली नाही. त्यामुळे अशा शेतक-यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. वादळी वा-यामुळे धान, मका, आंबा पिकाला मोठा फटका बसणार आहे. तसेच गारपीठमुळे भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान होणार आहे. मागील वर्षीही हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला होता. यावर्षीही तिच परिस्थिती उद्भवल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.