अवकाळीसह वादळी वारा, गारपीट, मेघगर्जना होण्याची शक्यता

जिल्हा कृषी हवामान केंद्राची माहिती
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्हयामध्ये कृषी हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, १५ ते १८ मार्च दरम्यान आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ व अवकाळीसह वादळी वारा, गारपीट, मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात १५ मार्च रोजी तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता, १६ मार्च रोजी विरळ ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा, १७ मार्च रोजी बहुदा सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस तसेच तुरळक ठिकाणी गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वारा वाहण्याची अधिक शक्यता, १८ मार्च रोजी बहुदा सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कृषी सल्ला
पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी व मळणीचे कामे तत्काळ उरकून घ्यावी. कापणी व मळणी केलेला शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. मेघगर्जनेसह विजांची शक्यता लक्षात घेता शेतामध्ये काम करत असताना दोन व्यक्तींमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे. मेघगर्जनेची चाहूल लागताच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडांखाली आसरा घेणे कटाक्षाने टाळावे. शेळ्या, गाय, म्हैस व इतर पाळीव जनावरांना झाडाखाली न बांधता त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे तसेच गोठ्या मधेच चारा व पाण्याची उपलब्धता करून घ्यावी. गोठ्याची देखभाल आणि दुरुस्तीची कामे २ दिवसामध्ये पूर्ण करावी.

दामिनी ऍप डाउनलोड करावे
हवामान अंदाजानुसार अवकाळी पावसासोबतच विजा पडण्याची शक्यता असताना पूर्वसूचना आपल्या मोबईलवर मिळण्याकरिता दामिनी अँपचा वापर करून संभाव्य मनुष्य हानी व पशुधन हानी टाळण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातील जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राने केले आहे.