पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपीस सश्रम कारावास

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : कुऱ्हाड व विळ्याने पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपीस 2 वर्ष 8 महिने सश्रम कारावासाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी ठोठावली आहे. राजेशाम बालमल्लू दुर्गम (40) रा. जाफ्राबाद ता. सिरोंचा असे आरोपीचे नाव आहे.
मोकेला गावचे पोलिस पाटील यांनी 30 जून 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता बामणी पोस्टेचे प्रभारी अधिकारी यांना फोनद्वारे माहिती दिली की, आरोपी राजेशाम दुर्गम रा. जाफ्राबाद यास पोलिस स्टेशन बामणी येथे हजर राहण्याबाबत सांगण्याकरीता गेलो असता, सदर इसमाने माझ्या गळ्यावर कुऱ्हाड ठेवून तुला जिवानिशी ठार मारतो, असे म्हणत असून तुम्ही लवकर काहीतरी करा, असे फोनवर सांगितले. त्यामुळे बामणीचे प्रभारी अधिकारी यांनी पथकासह लागलीच 11 वाजता जाफ्राबाद येथील राजेशाम दुर्गम याच्या घरी पोहोचले. यावेळी राजेशाम हा हातात कुऱ्हाड घेऊन पोलिस पाटलाशी वाद घालीत होता. त्याला कुऱ्हाड बाजुला टाकून दे असे पोलिसांनी सांगितले असता, तुम्हाला पण सोडणार नाही, असे बोलून हातातील लोखंडी कुऱ्हाडीने प्रभारी अधिकारी यांच्या छातीवर डाव्या बाजुस वार केला. सोबत असणारे शिपाई याने सदर इसमास पाठीमागे ढकलून दिल्याने तो पाठीमागे खाली पडला. त्याची कुऱ्हाड हिसकावून घेतली. लगेच त्याने घरातील विळा हातात घेवून पोलिस शिपाई याच्या डोक्यात विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. त्याच्या मदतीला गेलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला सुद्धा त्याने विळ्याने वार करुन गंभीर दुखापत केली.
याबाबतची तक्रार फिर्यादीने उपपोस्टे बामणी येथे दिली. तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी आरोपी राजेशाम बालमल्लू दुर्गम यास कलम 324 भादंवि 2 वर्ष 8 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकिल एस. यु. कुंभारे यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास पोउपनि सुधीर घुले व पोउपनि उदय पाटील यांनी केला. कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचा-यांनी कामकाजात योग्य भूमिका पार पाडली.