‘त्या’ हत्येत सहभागी जहाल नक्षल्यास अटक

विविध प्रकारचे 22 गुन्हे दाखल

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील मर्दहूर येथे साईनाथ नरोटी या युवकाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येत सहभागी असलेल्या जहाल नक्षल्यास पोमके नारगुंडा हद्दीतील मर्दहूर जंगल परिसरात अटक करण्यात पोलिस जवानांना यश आले आहे. प्रकाश ऊर्फ देविदास ऊर्प आडवे मुरे गावडे (27) रा. मर्दहूर असे अटक करण्यात आलेल्या नक्षलीचे नाव आहे.
उपविभाग भामरागड अंतर्गत येत असलेल्या नारगुंडा पोलिस मदत केंद्र हद्दीतील मर्दहूर येथील रहिवासी असलेला व पोलिस भरतीसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या साईनाथ नरोटी या युवकाची 9 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी गोळी झाडून हत्या केली होती. या घटनेचा तपास करीत असतांना या हत्येत आडवे मुरे गावडे या जहाल नक्षलीचा समावेश असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना प्राप्त झाली होती. या अनुषंगाने मंगळवारी गोपनीय माहितीच्या आधारे मर्दहूर गावापासून 10 किमी अंतरावरील जंगल परिसरात विशेष अभियानाचे पथक नक्षल विरोधी अभियान राबिवत असतांना आडवे मुरे गावडे यास अटक करण्यात यश आले. त्याचेवर भामरागड पोलिस ठाण्यात हत्येत सहभागी असल्याची खात्री पटल्याने गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
अटक करण्यात आलेला गावडे हा माहे मार्च 2000 मध्ये पेरमिली दलममध्ये सदस्य म्हणून दाखल झाला होता. त्यानंतर त्याची प्लाटून दलम उत्तर गडचिरोली गोंदिया डिव्हीजनमध्ये बदली करण्यात आली. सन 2007-08 मध्ये सेक्शन डेप्यूटी कमांडर या पदावर कार्यर होता. यानंतर जुलै 2011 पर्यंत प्लाटून ए कमांडर म्हणून त्याने जबाबदारी पार पाडली. तर फेब्रुवारी 2012 पर्यंत तो देवरी दलममध्ये दलम कमांडर म्हणून कार्यतर होता. त्यांचेवर 10 खुन, 8 चकमक, 1 दरोडा, 2 जाळपोळ व इतर 1 असे विविध प्रकारचे 22 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे.