मेंढा ठरली रोहयो अंतर्गत काम घेणारी पहिली ग्रामसभा

– राज्यातील पहिल्या कृषी गोदाम कामाचे भूमीपूजन
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : सामुदायिक वन अधिकार मान्यता प्राप्त गावाच्या ग्रामसभांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हामी योजनेंतर्गत कामे करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 2021 मधे शासनाने मंजूरी दिली. यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा ग्रामसभेद्वारे नरेगातील कामे हाती घेण्यात आली. याअंतर्गत कृषी गोदाम कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते करण्यात आले. मेंढा (लेखा) ग्रामसभा रोहयो योजनेअंतर्गत राज्यातील पहिलेच गाव ठरले आहे.
विकेंद्रीत पद्धतीने गाव, टोला, पाडा हे घटक म्हणून नियोजन केले तर त्याचे चांगले व निश्चित परिणाम होतील तसेच गावातील नागरिक यात सहभागी होतील, या हेतूने रोजगार हमी योजनेंतर्गत सामुदायिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांना अंमलबजावणी यंत्रणा म्हणून घोषित केले आहे. धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) ग्रामसभा सामुदायिक वन अधिकार मान्यता प्राप्त करणारे राज्यातील पहिले गाव आहे. दरम्यान शासनाने मेंढा ग्रामसभेलाही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हामी योजनेंतर्गत कामे करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मंजूरी दिली. याअंतर्गत मेंढा ग्रामसभेच्या वतीने गावात रोहयो अंतर्गत कामे हाती घेण्यात आले आहे. नुकताच जिल्हाधिका-यांच्या हस्ते मेंढा येथे रोहयो अंतर्गत राज्यातील पहिल्या कृषी गोदाम बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. सदर कृषी गोदाम बांधकामामधे 1.43 लाख रूपयांचे अकुशल, 27.01 लाख रूपयांचे कुशल व 5.57 लाख रुपयांचे साहित्य असे एकूण 34.02 लाख रूपयांचे काम आहे.
कृषी गोदाम कामाचे भूमिपूजनाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा मेंढा (लेखा) ग्रामसभा अध्यक्ष देवाजी तोफा यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, धानोराचे तहसिलदार विरेंद्र जाधव, गट विकास अधिकारी टिचकुले, सरपंच श्रीमती दुगा, ग्रामसभेचे पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.
ग्रामस्थांनी गोदामाचे काम वेळेत पूर्ण केल्यास समाज मंदिरासह रस्त्यांची कामे हाती घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील पहिले आदर्श गाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करेल. तसेच याबाबत विविध कामांचा आंतर्भाव करून प्रस्ताव पाठविण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हयात सर्व प्रकारच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करणारे, लोकसहभाग असलेले एक गाव तयार झाल्यास त्यांचा आदर्श घेवून इतरही गावे समोर येतील, असा विश्वास जिल्हाधिका-यांनी यावेळी व्यक्त केला. ग्रामीण भागात गोदामाचे मोठे महत्व आहे. प्रत्येक गावात याची उभारणी झाल्यास शेतक-यांना आपला माल तसेच वनउपज सुरक्षित साठवता येणे शक्य होणार आहे. मेंढा ग्रामसभेपासून याची सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा आता नरेगातही उत्तम कामे करतील व गावापासून सुरू झालेले हे काम देशभर जाईल.असे मत सामाजिक कार्यकर्ते (मेंढा) देवाजी तोफा यांनी व्यक्त केले.
तीन महिन्यात काम पूर्ण करण्याचा संकल्प
उपजिल्हाधिकारी रोहयो विजया जाधव यांनी ग्रामसभा अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्य करीत असतानाची प्रक्रिया ग्रामस्थांनी सांगितली. आता ग्रामसभांना स्वतंत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. आजपर्यंत 74 ग्रामसभांची नोंदणी करण्यात आली असून यापैकी 49 ग्रामसभांचे मजूर अर्थसंकल्प तयार झाले आहे. याअंतर्गत 1633 कामांचे नियोजन करण्यात आले याकरिता 5170.6 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. एकुण 11.90 लाख मनुष्य दिन कामे नियोजित आहेत. ग्रामसभांचे वनउपज व कृषी माल साठवणूक करीता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतुन धानोरा तालुक्यातील 3 ग्रामसभेमध्ये 250 मेट्रीक टन क्षमतेचे कृषी गोडाऊन निर्मितीचे काम सुरु करण्यात आले आहे. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून आगामी तीन महिन्यात काम पुर्ण करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.