अखेर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर

-पोलिसांनी  शेतकऱ्यांना केले स्थानबद्ध

GADCHIROLI TODAY

देसाईगंज : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा ढोल पिटत आम्ही सत्तेत आल्यास मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज पुरवठा करण्याचे आश्वासीत केले होते. मात्र, सत्तेत आलेल्या शिंदे- फडणविस सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना १२ तासावरुन ८ तास वीज पुरवठा करणे सुरु केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.

देसाईगंज तालुक्यातील शंकरपुर स्थित महावितरण फिडरवरून लगतच्या कोरेगाव-चोप परिसरात १६ तास वीज पुरवठा करण्यात येतो. परंतु, याच फिडर अंतर्गत शेतकऱ्यांना फक्त ८ तास वीज पुरवठा करण्यात येत आहे. पुरेशा वीज पुरवठ्याअभावी नुकतेच रोवणी झालेले धान पिक करपु लागल्याने यथायोग्य सिंचन सुविधे अभावी केलेला खर्च पाण्यात जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान पिक वाचवण्यासाठी धडपड चालवली आहे. दरम्यान, या गंभीर समस्येला घेऊन देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी छगन शेडमाके यांच्या नेतृत्वात शंकरपुर स्थित महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केले.
दरम्यान, आंदोलनात सहभागी जेष्ठ नेते परसराम टिकले, सामाजिक कार्यकर्ते छगन शेडमाके, नंदु नरोटे, पिंकु बावणे, नितीन राऊत, वामन सावसाकडे, गजानन शेलोटे, विलास बन्सोड, विलास ढोरे, होमराज हारगुळे, नरेश लिंगायत, विनायक वाघाडे, जगदीश शेंद्रे, मनोज ढोरे, अभय नाकाडे, महेश भरणे, अभय बुद्धे, आशिष गभने, युवराज गभणे, चक्रधर नाकाडे, बालु दुनेदार, यादव बन्सोड, संदिप वाघाडे, उमाशंकर हारगुळे, गणेश वारगुळे आदी शेतकऱ्यांना देसाईगंज पोलिसांनी स्थानबद्ध करून अटी व शर्थिच्या अधिन राहुन सोडले. तथापी शेतकऱ्यांची मागणी पुर्ण करण्याकडे दुर्लक्ष करून तोंडाला पाने पुसल्या गेले असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत येत्या तीन दिवसाच्या आत मागणी मान्य न केल्यास देसाईगंज येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आंदोलक शेतकऱ्यांनी दिली.