8 आत्मसमर्पित नक्षल्यांसह 127 आदिवासी अडकणार विवाह बंधनात

पोलिस विभाग व मैत्री परिवार संस्थेचा पुढाकार
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : पोलिस दल पोलिस दादालोरा खिडकी आणि मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली शाखेच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 26 मार्च रोजी चंद्रपूर मार्गावरील अभिनलच्या पटागावर सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यात आत्मसमर्पण केलेल्या 8 नक्षल्यांसह दुर्गम भागातील 127 आदिवासी तरूण-तरुणी विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे.
जिल्हा पोलिस दलाची ‘पोलिस दादालोरा खिडकी’ मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. आदिवासी बांधवांची भयग्रस्त वातावरणातून मुक्तता करणे तसेच त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. सामुहिक विवाह सोहळा देखील त्याच शृंखलेतील एक उपक्रम आहे. मैत्री परिवारातर्फे 2015 ला नागपूर येथील सामुहिक विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. मैत्री परिवार संस्था दीड दशकापासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहे.
मैत्री परिवराने गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला असून पोलिस विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील विविध भागात दिपावली सण साजरा करण्यासोबतच, कपडे वाटप, वैद्यकीय शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, रोजगार मेळावे राबविले जात आहेत. या विवाह सोहळ्याअंतर्गत आतापर्यंत 15 आत्मसर्पित नक्षल जोडप्यांसह एकूण 433 आदिवासी युवक-युवतींचे विवाह पार पडले आहेत. 26 मार्च रोजी विवाह सोहळ्यात सहभागी 8 नक्षल्यांची नावे सुरक्षितेच्या दृष्टीकोणातून उघड करण्यात आले नसून सर्व जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. दानशुर व्यक्तींनी प्रत्येकी एका जोडप्याचे पालकत्व स्वीकारून 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च करू शकणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला पोलिस अधीक्षक निलोत्पल, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भंडे, सचिव प्रमोद पेंडके यासह पदाधिकारी उपस्थित होते.