डीआयजींनी केला नक्षल प्रभावित क्षेत्राचा दौरा ; जवानांच्या जाणल्या समस्या   

GADCHIROLI TODAY

अहेरी : केंद्रीय राखीव पोलिस दल पश्चिम क्षेत्र मुख्यालय, नवी मुंबईचे पोलिस महानिरीक्षक पी. एस. रणपिसे यांनी पोलिस उपमहानिरीक्षक प्रभातचंद्र झा, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक जगदीश मीणा यांचेसोबत अहेरी येथील सीआरपीएफ बटालियनच्या प्राणहिता पोलिस कॅम्पला भेट दिली. यासोबतच त्यांनी नक्षलप्रभावित परिसराचा दौरा करीत येथे कार्यरत अधिकारी व जवानांशी संवाद साधित त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या भेटी दरम्यान पी. एस. रणपिसे यांनी 9 व 37 बटालियनच्या कॅम्पची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकारी आणि जवानांना सैनिक संमेलनाच्या माध्यमातून संबोधित केले. यादरत्यान त्यांनी सर्व अधिकारी व जवानांना प्रोत्साहन दिले व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यास समस्येला सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी केले. नक्षलवादग्रस्त भागातील सर्वसामान्य जनतेचे मानवी हक्क लक्षात घेऊन नक्षलवाद्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या. नक्षलवादग्रस्त भागातील गरीब आणि गरजू आदिवासी लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सीआरपीएफ पोलिस महानिरीक्षक रणपिसे यांनी कॅम्पला दिलेल्या भेटीदरम्यान अधिकारी व जवानांच्या देण्यात येणा-या मुलभूत सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी मिळत असलेल्या सोयीसुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच जवानांना कोणत्याही अडचणी भासू नये यासाठी अधिका-यांना यासंदर्भात स्पष्ट निर्देशही दिली. नक्षलग्रस्त भागात सेवारत असतांना स्वत:च्या आरोग्यासोबत शारीरिक तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन डीआयजी यांनी संबंधित अधिकारी व जवानांना भेटीदरम्यान केले. नक्षलग्रस्त भागात धैर्याने सर्व समस्यांना तोंड देत सेवा बजावित असलेल्या त्यांच्या कार्याबद्दल यावेळी त्यांनी जवानांचे भरभरुन कौतूकही केले. कार्य करीत असतांना नागरीकांच्या मानवी हक्काचे संरक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सैनिक संमेलना दरम्यान प्रभात चंद्र झा, 37 बटालियनचे कमांडंट एम. एच. खोब्रागडे, 9 बटालियनचे कमांडंट आर. एस. बालापूरकर, 37 बटालियनचे उप कमांडंट रजनीश कुमार, रमेश सिंग, डॉ. श्रीनिवासलू रेड्डी (मुख्य वैद्यकीय अधिकारी) तसेच दोन्ही बटालियनचे सर्व अधिकारी व जवान उपस्थित होते.