गडचिरोली : साडेपाच तासांच्या रेस्क्यूनंतर वाघीण जेरबंद

गडचिरोली TODAY शी जुळण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा

👇

https://chat.whatsapp.com/HCV7EbrJsPAHd8HcLppHjF

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : गडचिरोली शहरातील आयटीआय चौकातील राष्ट्रीय महामार्ग ओलांडून कृषी महाविद्यालयाच्या नर्सरीममध्ये प्रवेश करतांना वाघीण दिसून येताच शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने चंद्रपूरच्या आरआरटी पथकाला पाचारण केले. विशेष पथकाने घटनास्थळ गाठून साडेपाच तासांच्या रेस्क्यूनंतर वाघिणीला जेरबंद केले.
शहरातील आयटीआय चौकातील राष्ट्रीय महामार्ग ओलांडून कृषी महाविद्यालय परिसरात असेलल्या नर्सरीमध्ये वाघीण प्रवेश करतांना अनेकांना दिसून आली. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची एकच गर्दी झाली होती. यासंदर्भात माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी नर्सरी परिसरात दाखल होऊन वाघावर पाळत ठेवली होती. सोबतच या घटनेची माहिती चंद्रपूरच्या विशेष पथकाला देण्यात आली होती. वनविभागाने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना केल्या होत्या. यावेळी सदर परिसरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. काही वेळानंतर घटनास्थळी पोहचलेल्या आरआरटी पथकाने वाघिणीला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे पर्यंत सुरु केले. तब्बल साडेपाच तासानंतर सदर वाघिणीला जेरबंद करण्यात यश आल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह गडचिरोलीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या नेतृत्वात गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, सहायक उपवनसंरक्षक सोनल भडके, आरएफओ धीरज ढेंबरे, आरआरटीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी, आरआरटी पथकाने वाघिणीला जेरबंद करण्याचे मोहीम फत्ते केली. यावेळी वन्यजीव संरक्षक मिलिंद उमरे, वन्यजीवप्रेमी अजय कुकुडकर उपस्थित होते.

शहरवासीयांमध्ये दहशत

जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरातील वर्दळीच्या परिसरातून चक्क वाघीणीने कृषी महाविद्यालयाच्या नर्सरीममध्ये प्रवेश केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या नर्सरीत वाघिणीने सकाळपासूनच ठिय्या मांडून बसल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. तर वाघिणीला बघण्यासाठी मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारक तसेच स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभाग तसेच पोलिस विभागाने आपापल्या पथकासह तत्काळ घटनास्थळ गाठले.