अपघात झाल्याचा बनाव करीत पत्नीची हत्या करणाऱ्यास जन्मठेप

– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : अपघात झाल्याचा बनाव करीत पत्नीस जीवे ठार मारणाऱ्या आरोपी पतीस न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी दिला. संदीप राजाराम कुमरे (29) रा. दर्शेवाडा ता. सिरोंचा असे शिक्षा सुनावलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
फिर्यादीची बहिण सूर्यमाला हिचे आरोपी संदीप कुमरे याच्यासोबत सन 2014 मध्ये लग्न झाले होते. मात्र आरोपीचे कोलपल्ली येथील एका महिलेशी काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. अश्विनी ही फिर्यादीच्या बहिणीला फोनद्वारे मी संदीपसोबत नांदायला येत आहे, असे सांगून भांडण करीत होती. त्या कारणाने माझ्या बहिणीचे व भाऊजीचे नेहमी भांडण होत होते. अशातच सूर्यमालाचे माहेरचे नाव राशन कार्डवरुन कमी करुन दर्शेवाडा येथील पत्त्यावर नवीन नाव नोंविण्यासाठी मी व सूर्यमाला अहेरी तहसील कार्यालयात जाणार असल्याचे माझ्या भाऊजीला सकाळी कळविले होते. मात्र, दुपारी 1 वाजतादरम्यान घरी हजर असताना सोनू झाडे यांनी फोनद्वारे पर्सेवाडाच्या पुढे अपघात होवून तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला. तर भाऊजी जखमी असल्याची माहिती दिली. फिर्यादी व तिचा मामा यांनी घटनास्थळावर जावून पाहिले असता, रस्त्याच्या कडेला मोटारसायकल पडून होती. दुचाकीपासून 45 ते 50 फुट अंतरावर खोल दरीत बहिणीचा रक्तस्त्रात होवून मृत्यू झाल्याचे दिसून आले. शेजारी संदीप रक्ताने माखलेल्या स्थितीत दिसला. राशन कार्डच्या कामकाजाकरीता अहेरी येथे जायचे आहे, असे कारण सांगून जवळच्या मार्गे न जाता अश्विनीशी लग्न करण्याच्या व बहिणीला ठार मारण्याच्या उद्देशाने बेजूरपल्ली मार्गे जावून मोटार सायकल अपघात झाल्याचा बनाव करून माझ्या बहिणीला दगडाने ठेचून जिवानीशी ठार केल्याची तक्रार फिर्यादी कुमारस्वामी नानाजी दुर्गे यांनी उपपोस्टे रेगुंठा येथे दाखल केली. तक्रारीवरुन आरोपीवर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस विभागाने तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी आरोपी संदीप कुमरे यास आज कलम 302 भादंविमध्ये जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकिल एस. यु. कुंभारे यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास रेगुंठा उपपोस्टेचे पोउपनि बाळासाहेब सूर्यवंशी तर कोर्ट पैरवी म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योग्य भूमिका पार पाडली.