23 ला सर्चमध्ये प्लास्टिक, पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया व श्वसन विकार ओपिडी

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित सर्च रुग्णालयात 23 मार्च रोजी प्लास्टिक, पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया व श्वसन विकार ओपिडीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गरजुनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्लास्टिक सर्जरी आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेच्या वैद्यकीय पैलूंमधील तांत्रिक शोध आणि विकासामुळे जीवन सोपे झाले आहे. या प्रक्रिया आता कमी वेदनादायक आणि कमी वेळ घेणारी झाल्या आहेत. ह्या सेवे मध्ये दुभंगलेले ओठ किंवा दुभंगलेला टाळू, जळलेल्या त्वचेचे संकुचन, पुरुषात स्तनांची वाढ, युक्तांगुलिता, अधिकांगुलियता, मूत्र उत्सर्ग नलिकेच्या मार्गात खालच्या बाजूला छिद्र असणे, जुळलेले बोट, सांधे, कुटुंब नियोजन ऑपरेशन उघडणे अश्या आजारांवर मुंबईचे तज्ञ डॉ. श्रीरंग पुरोहित व त्यांची टीम उपचार करतील.
जागतिक अंदाजानुसार कर्करोग आणि हृदय विकारानंतर श्वसन विकार हे मृत्यूचे तिसरे सर्वात महत्त्वाचे कारण ठरत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे या विकाराचे प्रमाणही निर्विवादपणे वाढतच आहे. गडचिरोली सारख्या भागातही वाढत्या शहरीकरणामुळे श्वसन विकारांचे रुग्ण वाढत आहेत. दमा (अस्थमा), सिगारेट मुळे झालेले श्वसन विकार, क्षयरोग व क्षयरोगा नंतर होणारे फुफ्फुस विकार, कोरोना मुळे उद्भवलेले फुफ्फुस विकार, लहान मुलांचा दमा, ॲलर्जी मुळे होणारे श्वसन विकार अशा असंख्य श्वसन विकारांवर उपचार दिले जातील. नागपुर येथील अनुभवी श्वसन विकार तज्ञ डॉ.व्रुषभ राज उपलब्ध राहतील. तरी सर्वांनी या ओपिडी चा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन सर्चने केले आहे.