शेततळ्यात बुडून युवकाचा मृत्यू

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शेततळ्यात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील उमरी गावाशेजारी सोमवारला दुपारच्या सुमारास घडली. विशाल ईश्वर बारसिंगे (20) रा. चंद्रपूर असे मृतक युवकाचे नाव आहे.
विशाल हा मलेझरी व तुमडी येथे सुरुवातीला आपल्या नातेवाईकांकडे आला. त्यानंतर तो तेथून 18 किमी अंतरावरील उमरी येथे दुस-या नातेवाईकाकडे गेला. दरम्यान, गावालगत असलेल्या शेततळ्यात तो सोमवारी गेला. याचवेळी त्याचा पाय घसरला व तो पाण्यात बुडून मरण पावला. तो मासे पकडण्यासाठी गेला, अशी चर्चा सुरु आहे. सदर घटनेची माहिती मलेझरीला राहणा-या त्याच्या आजोबांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मर्ग दाखल केला. मृतकाचे शव आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.