ग्रामस्थांचा पुढाकार : 2014 पासून दारू विक्रीमुक्त गावाने उभारला विजयस्तंभ

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : दारुचे व्यसन सामाजिक, आरोग्य व आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक आहे. हे लक्षात येताच अहेरी तालुक्यातील जामगाव येथील ग्रामस्थांनी संघर्ष करून आपल्या गावाला 2014 पासून दारू विक्रीमुक्त ठेवले आहे. नुकताच या गावाने विजयस्तंभ उभारून जल्लोष साजरा केला.
जामगाव येथे महिला व पुरुषांना अवैध दारूविक्रीमुळे गावावर येणारे संकट लक्षात येताच गावाने एकी दाखवली. अवैध दारूविक्री बंदीसाठी बैठकीचे आयोजन करून दारूबंदीचा निर्णय घेतला. निर्णयानुसार दारूविक्रेत्यांना अवैध व्यवसाय बंद करण्याची सूचना दिली. तरीसुद्धा काही विक्रेत्यांनी निर्णयाची पायमल्ली करीत आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता. त्यामुळे महिलांनी अहिंसक कृतीचा शस्त्र उगारीत विक्रेत्यांच्याहातभट्ट्या उध्वस्त केल्या. अशा विवीध उपाययोजना करीत गावाला अवैध दारू विक्रीतून मुक्त केले. 2014 पासुन आता सलग 8 वर्ष गाव दारूमुक्त आहे. यासाठी मुक्तीपथ अभियानातर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.
या गावाने सलग 8 वर्ष दारूबंदी कायम टिकवून विजयस्तंभ उभारला आहे. या उपक्रमाचे उदघाटन मुक्तीपथ अभियानाचे संचालक तपोजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपसरपंच सुरेश आत्राम, पोलिस पाटील अरविंद निखोडे, तंमुस अध्यक्ष व्यंकटेश धानोरकर, कोटगले, शामराव पिपरे, हनुमंतू शेंडे, शंकर डोके, विलास पिपरे, संतोष टोमरे, दौलत वेलादी, ज्ञानेश्वर येलेकर, बाबुराव डोके, मुक्तीपथ चमू आनंदराव कुम्मरी, स्वप्नील बावणे यांच्यासह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.