वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रयत्न : तिघांवर वनगुन्हा दाखल

GADCHIROLI TODAY
– आरडा नियतक्षेत्रातील कारवाई
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील आरडा नियतक्षेत्रातील जंगलात विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने वन्यजीवांची शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याकडून बाईंडिंग तार जप्त करीत वनविभागाने तिघांवर वनगुन्हा दाखल केला आहे. रामुलू पोचम अर्का, श्रीनिवास पोचम गावडे, स्वामी रामुलू कोडपे तिघेही रा. नंदीगाव असे आरोपींचे नाव आहेत.
आरडा नियतक्षेत्रातील जंगलपरिसरात 21 मार्च रोजी वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहायक एस.एस.निलम, वनरक्षक व्ही. ए. काटींगल, वनरक्षक आर.वाय.तलांडी गस्तीवर असतांना खंड क्रमांक 356 मध्ये रामुलू पोचम अर्का व त्याचे सहकारी वन्यजीव शिकारीच्या उद्देशाने जमीनीमध्ये लाकडी खुंट्या गाळुन जमीनीपासुन 2 ते 2.6 फुट उंचीवर बाईंडिंग तार खुंट्याला बांधून पसरवित असतांना आढळून आले. तेव्हा वनकर्मचाऱ्यांना बघताच दोघे पसार झाले तर रामुलू पोचम अर्का यांना ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता, विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने वन्यजीव शिकारीच्या उद्देशाने बाईंडिंग तार पसरवित असल्याची त्याने कबुल केले. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने 22 मार्च रोजी फरार आरोपी श्रीनिवास पोचम गावडे व स्वामी रामुलू कोडपे यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला. सदर प्रकरणाची चौकशी सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक पुनम पाटे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम.पाझारे करीत आहेत.