गडचिरोली जिल्ह्याला भविष्यात क्षयरोग मुक्त करा : जिल्हा प्रशासनाचे आवाहन

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : क्षयरोग निदानाकरीता उपलब्ध असलेल्या उपचार पध्दतीचा लाभ घेऊन गडचिरोली जिल्ह्याला भविष्यात क्षयरोग मुक्त करण्याचे आवाहन 24 मार्च या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग नियंत्रण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
राबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी 24 मार्च 1882 मध्ये मायकोबॅक्टेरीअम टयुबरक्युलोसीस या जीवाणूंचा शोध लावला. त्यामुळे 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. सन 1905 मध्ये त्यांना औषधशास्त्रामधील ऊत्कृष्ठ कामगिरीबद्दल मानाचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या रोगाने संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक देशातील शासन आपले स्तरावर अथक प्रयत्न करीत आहे. भारतामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 1962 पासून प्रस्थापित जिल्हा क्षयरोग केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा क्षयरोग दवाखान्यांमध्ये राबविला जात आहे. प्रारंभीच्या काळापासूनच या कार्यक्रमाची सांगड सर्वसामान्य आरोग्य सेवांशी घालण्यात आली होती. क्षयरोग विषयक सेवांचे वितरण प्राथमिक सेवांच्या माध्यमातून करण्यात येत होते. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम उद्दिष्ट्ये हे 2025 पर्यंत आपल्या भारतातून नष्ट करावयाचे आहे. त्यामुळे प्रत्येक नागरीकांनी क्षयरोगाविषयीची माहिती घेऊन त्याची जनजागृती करावी. 24 मार्च 2023 जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य ‘होय आपण टीबी संपवु शकतो’ हे आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत सर्व क्षयरुग्णांना त्यांच्या वजनानुसार मोफत औषधोपचार पुरविल्या जातो. तसेच टिबीच्या निदानासाठी जिल्हा क्षयरोग येथे एलईडी सुक्ष्मदर्शी अत्याधुनिक यंत्र व सिबीनॅट यंत्र उपलब्ध असून सिबीनॅट यंत्राव्दारे निदान अवघ्या दोन ते तिन तासात करणे शक्य झालेले आहे. जिल्ह्याला भविष्यात क्षयरोग मुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके यांनी केलेले आहे.
राज्यात गडचिरोली अव्वल
क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर उपचारास येणाऱ्या रुग्णास दरमहा 500 रुपये डीबीटी स्वरुपात निक्षय पोषण योजनाद्वारे औषधोपचार पुर्ण होईपर्यंत देण्यात येतात. जेणेकरुन रुग्ण चांगले पौष्टीक आहार प्राशन करु शकेल. सन 2022 या कालावधीमध्ये जिल्ह्यात शासकिय रुग्णालय व खाजगी रुग्णालय मिळून एकूण 2039 क्षयरुग्ण शोधुन काढण्यात आले होते. त्यांना औषधोपचार देण्यात आला. सदर कालावधीतील कामाकरीता गडचिरोली जिल्ह्याला संपुर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले होते.