जिल्ह्यात 188 कोटी 60 लाखाची थकबाकी : बत्ती गूल करण्याची कारवाई जोमात

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : चंद्रपूर परिमंडळातील गडचिरोली जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी 188 कोटी 60 लाख वर पोहोचली असून थकबाकीचा डोंगर जिल्ह्यात उभा ठाकला आहे. त्यामुळे महावितरणकडून थकबाकीदारांची बत्ती गूल करण्याची कारवाई जोमात सुरु करण्यात आली आहे.
थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी मैदानात उतरले आहेत. वेगवेगळया चमूंही यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली जात आहे. महावितरणला ग्राहकांकडून मिळणारे वीज बिलाचे पैसे हाच उत्पन्नाचा एकमेव मार्ग आहे. बिलाच्या उत्पन्नातून कंपनी वीज खरेदीचे पैसे, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि वीज प्रकल्पांचा खर्च भागवते. ग्राहकांना अखंड वीज पुरवठा करायचा तर महावितरणला वीज खरेदी करण्यासाठी पैसे उभे करणे आवश्यक आहे. महावितरणकडे बिलांच्या माध्यमातून पैसे आले तरच कंपनीला वीज खरेदी करणे आणि ती ग्राहकांना पुरविणे शक्य आहे. वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना पर्यावरणपुरक ऑलाईन पेमेंट, मोबाईल अॅप, गुगल पे, पेटीएम या यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नियमित ग्राहकांचा प्रतिसादही या सुविधांना चांगल्या प्रकारे लाभत असल्याचे चित्र आहे. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीज ग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल अॅप किंवा इतर ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीज बिलांचा भरणा करून सहकार्य करावे.
ग्राहकनिहाय थकबाकी
गडचिरोली जिल्ह्यात 5 ते 10 वर्षापासून 4 हजार 32 कृषी ग्राहकांनी 24 कोटी 41 लाख भरले नाही. जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांची थकबाकी 4 कोटी 74 लाख, तर वाणिज्यिक 71 लाख, औद्योगिक 1 कोटी 32 लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा 31 लाख, सरकारी कार्यालये व ईतर ग्राहकांची थकबाकी 2 कोटी 66 लाख, ग्रामिण व शहरी पथदिव्यांची थकबाकी 96 कोटी 23 लाखाच्या घरात तसेच कृषिपंपांची थकबाकी ही 82 कोटी 63 लाख अशी एकंदरीत 188 कोटी 60 लाखाच्या घरात थकबाकी पोहोचली आहे.
थकबाकीचा भरणा करून सहकार्य करा : देशपांडे
गडचिरोली जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची तसेच कृषी ग्राहकांनी महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेत थकबाकीचा भरणा करुन महावितरणला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे.