सावधान… जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा वावर , दक्षता बाळगा : कुकडकर

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्ह्यात सध्या वाघ व इतर वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे पहाटेच्या अंधारात फिरायला जाणे, अंधारात रस्त्याच्या बाजूला बसून योगा करणे टाळावे. तसेच मोहफूल संकलन हंगाम सुरू झाला असून नागरीकांनी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांनी केले आहे.
मोहफुल व तेंदूपत्ता जास्त मिळावा, यासाठी ग्रामीण भागातील नागरिक पहाटेच्या अंधारातच जंगलात जातात. अशावेळी जंगल परिसरात योग्य ती काळजी न घेतल्यास जीविताचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोहफूल व तेंदूपत्ता संकलन करताना आजू बाजूला लक्ष ठेवावे. शक्य तो जास्त वेळ खाली वाकून मोहफूल गोळा करू नये, एकाने जमा करावे व दुसऱ्यांनी आजू बाजूला लक्ष ठेवावे. एकट्याने जंगलात जाऊ नये. तीन चारच्या गटाने आवाज करीत जावे. जंगलात चौफेर नजर असावी. स्त्रीने पुरुषाच्या सोबतीने जावे. वाघ काय करतो, मेलो तर घरच्यांना २० लाख मिळतात असा विचार करू नये. म्हातारे व कमजोर व्यक्तीने जंगलात जाणे टाळावे. वाघ जंगलात दिसल्यास सर्वांनी आरडाओरड करावे व तिथून निघून जावे. मलाच मोफफुले व तेंदूपत्ता मिळाले पाहिजेत म्हणून एकट्याने जंगलात सैरावैरा भटकू नये. तेंदूपत्ता झुडपात असेल तर सावध होऊनच जवळ जावे. पाणवठ्या तलावाच्या जवळपास सावधगिरीने जावे कारण तिथे वाघ असू शकतो.
तेंदुपत्ता, मोहफूल गोळा करण्याकरिता दिवस उजळल्यानंतरच जावे व दुपार होण्यापूर्वी परत यावे. कोणत्याही वन्यप्राण्याला इजा करू नये कारण तो चौताळून इतर लोकांवर हल्ला करू शकते. जंगलात आग लावू नये त्याने वन्यप्राण्यांचे घर जळते व ते सैरावैरा पळून शेताकडे गावाकडे येतात. झाडे तोडणे, झाडावर चढणे टाळावे. मोहाच्या झाडाखालची जागा स्वच्छ करून घ्यावी पण आग लावू नये. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे व वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वन्यजीवप्रेमी तथा पीपल फॉर एनवोर्मेन्ट & एनिमल वेल्फेअर संस्थेचे सचिव अजय कुकडकर यांनी केले.